जालना प्रतिनिधी
सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे दिनांक २४ सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वाङमय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सेवा योजना दिवस’ आणि ‘वाङमय मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. र.तु. देशमुख हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मोरेश्वर महाविद्यालय भोकरदन येथील उपप्राचार्य प्रो. डॉ. गोवर्धन मुळक हे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ.प्रो. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे आणि उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रो.डॉ. गोवर्धक मुळक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रो.डॉ. गोवर्धक मुळक यांनी विद्यार्थी स्वयंसेवक यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगताना राष्ट्रीय सेवा योजने मधून विद्यार्थी , स्वयंसेवक यांचा सर्वांगीण विकास होऊन विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न नागरिक होतो तसेच याद्वारे समाजाचा व देशाचा विकास होण्यास हातभार लागतो असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर वाङमय मंडळाद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
असे मत प्रो.डॉ. गोवर्धक मुळक यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थी परिपूर्ण घडतो.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.मुळक सरांनी ” आजची महाविद्यालयीन दशा व विद्यार्थी “, आणि ” आईचे उपकार ” ,अशा कविता सादर करून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. र.तु. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच वाङमय मंडळ आणि महाविद्यालयातील विविध विभागामार्फत महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांना जीवनाचा मनसोक्त आस्वाद घेता येतो तसेच महाविद्यालयाचे आणि समाजाचे नावलौकिक करण्याची संधी मिळते.तरी विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील अकरावी, बारावी तसेच बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.डॉ. सुदाम पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शिवाजी जगतवाड यांनी सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रदीप मिसाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. मणियार तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागाच्या सहकार्याने व वाङमय मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवक, विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याहस्ते वृक्षारोपण करून घेण्यात आले. याप्रसंगी सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी-स्वयंसेवक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.