छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या बायो इन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेला नॅशनल कॅडेट्स कॉर्प्स कॅडेट (एनसीसी) ओम यादव याची प्रतिष्ठित अशा रिपब्लिक डे कॅम्प, नवी दिल्ली (आरडीसी ) साठी निवड झाली आहे.
ओम यादव हा सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या रिपब्लिक डे कॅम्पमध्ये सहभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे नेतृत्व करीत आहे. या कॅम्पच्या माध्यमातून तो महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती, कला, वारसा, लोकपरंपरा, संगीत तसेच राज्याच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची माहिती मान्यवरांना सादर करणार आहे. तसेच पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान राज्यांच्या संयुक्त तुकडीचा भाग म्हणून पंतप्रधानांच्या रॅलीसाठी त्याची निवड झालेली आहे.
ओम यादव हा ५१ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत एनसीसीचे प्रशिक्षण घेत असून त्याची शिस्तबद्ध जीवनशैली, उत्कृष्ट कवायत, नेतृत्वगुण आणि सांस्कृतिक सादरीकरणातील कौशल्य यासाठी तो ओळखला जातो.
या यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, संचालिका डॉ.अर्चना पांचे, एएनओ डॉ.रविंद्र काळे व सर्व संबंधितांनी ओम यादव याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
अभ्यासात हुशार, शिस्तप्रिय आणि सामाजिक भान जपणारा विद्यार्थी म्हणून ओम यादवची ओळख आहे. शिक्षणासोबतच एनसीसीमधील त्याची सक्रिय भूमिका, नेतृत्व कौशल्य आणि सांस्कृतिक कार्यातील सहभाग हे इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श उदाहरण ठरत आहे.









