गंगापूर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गंगापूर तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली. बुधवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसील परिसर फुलून गेला होता. मुदत संपेपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १०५ तर पंचायत समितीसाठी १५४ अंतिम अर्ज दाखल झाले. मात्र, शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या गोंधळ, तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे टोकन मिळूनही अनेक इच्छुकांना अर्ज भरता न आल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान नियोजन नसल्यामुळे बड्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याना कार्यालयात प्रवेश दिल्याने समर्थकांच्या घोषणाबाजीने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील ९ गटांसाठी १०५ आणि १८ गणांसाठी १५४ अर्ज दाखल झाले असले, तरी काही इच्छुकांना मोठा फटका बसला. पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले टोकन क्रमांक मिळूनही वेळेत अर्ज दाखल करता आला नाही. “मी वेळेत हजर होतो, टोकनही मिळाले होते, तरीही मला अर्ज भरू दिला नाही,” असा आरोप करत संताप व्यक्त केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
शिल्लेगाव गटातील सुप्रिया प्रमोद भालेराव तसेच सिद्धनाथ वाडगाव गणातील प्रमोद गोरख भालेराव यांनाही आला. तांत्रिक अडचणी, अपुरे मनुष्यबळ आणि गर्दीचे योग्य नियोजन न झाल्याने या इच्छुकांना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले. हक्काची संधी हुकल्याने त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, गंगापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, अवघ्या २४ तासांत पक्षीय तिकिटांची मोठ्या प्रमाणावर काटछाट झाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. तिकीट मिळेल या आशेवर अनेकांनी कॉर्नर मीटिंग, बैठका आणि मतदार संपर्क मोहिमा राबवत ग्रामीण भाग पिंजून काढला होता. मात्र अधिकृत उमेदवार यादी जाहीर होताच अनेकांची मेहनत वाया गेल्याचे चित्र दिसून आले.
तालुक्यातील बहुतांश गट व गणांमध्ये आधीपासून तयारीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. तर पक्षांतर्गत निर्णयामुळे नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी आता एकला चलोची भूमिका तर दुसरीकडे पक्षातर तसेच बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी, गंगापूर ग्रामीणमध्ये युतीच्या गणिताला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.












