भारतीय लोकशाहीची रचना तीन खांबांवर उभी आहे ते म्हणजे विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका. मात्र आधुनिक काळात एक चौथा, तितकाच महत्त्वाचा खांब पुढे आला आहे, तो म्हणजे ग्राहक. उत्पादन, सेवा, बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक हा आज केवळ खरेदीदार राहिलेला नाही, तर तो हक्क-जाणीव असलेला, प्रश्न विचारणारा आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणारा नागरिक बनू लागला आहे. हीच जाणीव दृढ करण्यासाठी दरवर्षी 24 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रमांचा किंवा भाषणांचा नसून, तो आहे ग्राहक हक्क, जबाबदाऱ्या आणि बाजारातील नैतिकतेचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस. “ग्राहक राजा आहे” ही घोषणा ऐकायला आकर्षक वाटते; पण खरा प्रश्न असा आहे की आजचा ग्राहक खरोखरच राजा आहे का, की जाहिरातींच्या, ऑफर्सच्या आणि फसव्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेला एक असहाय घटक?
24 डिसेंबर 1986 रोजी भारतात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. या कायद्याने भारतीय बाजारपेठेत एक मूलभूत बदल घडवून आणला. याआधी ग्राहक हा शोषण सहन करणारा, तक्रार करूनही न्याय न मिळणारा घटक होता. व्यापारी, उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांच्यापुढे ग्राहकाची ताकद नगण्य मानली जात होती. ग्राहक संरक्षण कायद्याने प्रथमच ग्राहकाला कायदेशीर ओळख, हक्क आणि न्यायासाठी स्वतंत्र यंत्रणा दिली. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचांच्या माध्यमातून ‘न्याय सहज, जलद आणि कमी खर्चात’ मिळावा, हा या कायद्याचा मूलमंत्र होता. त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ एक दिनविशेष न राहता, ग्राहक चळवळीचा मैलाचा दगड ठरला.
ग्राहक ही संकल्पना आज फार व्यापक झाली आहे. वस्तू खरेदी करणारा, सेवा घेणारा, ऑनलाईन व्यवहार करणारा, बँकिंग, विमा, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार सेवा वापरणारा, हे सारे ग्राहकच आहेत. म्हणजेच, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहकच असतो. त्यामुळे ग्राहक हक्कांचा प्रश्न हा केवळ बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता, तो थेट नागरिकांच्या जीवनमानाशी जोडलेला आहे. आज ग्राहक शोषणाची रूपे बदलली आहेत. पूर्वी मोजमापात फसवणूक, भेसळ, निकृष्ट दर्जा हे प्रकार प्रामुख्याने दिसत होते. आज त्यासोबतच डिजिटल फसवणूक, ऑनलाईन स्कॅम, लपविलेले शुल्क, चुकीच्या अटी, डेटाचा गैरवापर अशी नवी संकटे उभी राहिली आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला काही मूलभूत हक्क दिले आहेत. जसा सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळण्याचा हक्क, निवडीचा हक्क, ऐकून घेण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क आणि ग्राहक शिक्षणाचा हक्क. हे हक्क केवळ कागदावर मर्यादित राहू नयेत, तर ते व्यवहारात उतरवणे हीच राष्ट्रीय ग्राहक दिनाची खरी गरज आहे. कारण हक्क माहिती नसतील, तर ते वापरले जाणार नाहीत; आणि वापरले गेले नाहीत, तर ते निष्प्रभ ठरतात.
भारतात “ग्राहक राजा आहे” ही संकल्पना मोठ्या अभिमानाने मांडली जाते. जाहिराती, बॅनर, सरकारी मोहिमा यांतून हा संदेश दिला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा ग्राहक हा राजा नसून, प्रयोगाचा उंदीर ठरतो. आकर्षक जाहिरातींमागील अटी लपवल्या जातात, स्वस्ताच्या नावाखाली निकृष्ट सेवा दिली जाते आणि तक्रार केल्यावर ‘कस्टमर केअर’च्या फेऱ्यांत ग्राहक अडकतो. ग्राहक राजा बनण्यासाठी केवळ घोषणा पुरेशी नाही; त्यासाठी जाणीव, संघटितपणा आणि धैर्य आवश्यक आहे. अन्याय सहन न करता तक्रार करणे, पुरावे जपणे, मंचाचा वापर करणे, ही खरी राजेशाही आहे. आजचा ग्राहक डिजिटल झाला आहे. ऑनलाईन खरेदी, अॅप्स, कॅशलेस व्यवहार, ई-कॉमर्स यामुळे सोय वाढली आहे, पण धोकेही तितकेच वाढले आहेत. बनावट वेबसाईट्स, फेक रिव्ह्यूज, डेटा चोरी, ओटीपी फसवणूक या सगळ्यांचा सामना ग्राहकाला करावा लागतो. अशा काळात राष्ट्रीय ग्राहक दिन हा डिजिटल साक्षरतेचा आणि सतर्कतेचा संदेश देणारा दिवस ठरायला हवा. ‘स्वस्त’, ‘ऑफर’, ‘मर्यादित वेळ’ या शब्दांमागे न धावता विचारपूर्वक निर्णय घेणे, हीच आजच्या ग्राहकाची खरी गरज आहे.
हक्कांसोबत जबाबदाऱ्याही येतात. ग्राहकाने बिल घेणे, अटी वाचणे, फसवणूक लक्षात आल्यास तक्रार करणे, आणि चुकीच्या व्यवहाराला पाठिंबा न देणे ही त्याची सामाजिक जबाबदारी आहे. ग्राहक जागरूक नसेल, तर बाजारपेठ बेजबाबदार होते. राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ व्यापाऱ्यांना इशारा देणारा नसून, ग्राहकांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा दिवस आहे. आपण स्वतः किती जागरूक आहोत, हा खरा प्रश्न आहे. ग्राहक चळवळ ही लोकशाहीला बळ देणारी चळवळ आहे. कारण ती सामान्य माणसाला न्याय मिळवून देते. आज अनेक प्रकरणांत ग्राहक मंचांनी मोठ्या कंपन्यांना दंड ठोठावले आहेत. यामुळे बाजारपेठेत जबाबदारी आणि पारदर्शकता वाढते. मात्र अजूनही अनेक ग्रामीण, गरीब, अशिक्षित ग्राहक या यंत्रणेपासून दूर आहेत. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक शिक्षण, जनजागृती आणि सुलभ न्यायव्यवस्था यावर अधिक भर देणे ही काळाची गरज आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ एक औपचारिक दिनविशेष नसून, तो आहे ग्राहकाच्या स्वाभिमानाचा आणि हक्कांचा उत्सव. ‘ग्राहक राजा आहे’ ही घोषणा तेव्हाच खरी ठरेल, जेव्हा ग्राहक स्वतः जागरूक, सजग आणि निर्भय बनेल. बाजारपेठ मोठी झाली आहे, व्यवहार वेगवान झाले आहेत, पण माणूस केंद्रस्थानी राहिला पाहिजे. ग्राहकाचे शोषण थांबवणे म्हणजेच लोकशाहीचे मूल्य जपणे होय. म्हणून राष्ट्रीय ग्राहक दिन हा केवळ स्मरणाचा नव्हे, तर संकल्पाचा दिवस ठरायला हवा. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा. कारण जागरूक ग्राहक हाच सक्षम अर्थव्यवस्थेचा आणि न्याय्य समाजाचा खरा पाया आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रत्येक ग्राहक जागरूक, सजग आणि निर्भय व्हावा, हक्कांची जाणीव केवळ कागदापुरती न राहता व्यवहारात उतरावी, बाजारपेठेत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी आणि ‘ग्राहक राजा आहे’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकार व्हावी, याच मनापासून शुभेच्छा !









