छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- जिल्हा भरात १०० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी ‘आरोग्य समुपदेशन कार्यशाळा’ मंगळवार दि.२८ या एकाच दिवशी सकाळी १० वा. घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात शासकीय, खाजगी डॉक्टर्स विद्यार्थ्यांना आरोग्यदायक सवयी, आहार, विहार याबाबत मार्गदर्शन करुन समुपदेशन करतील.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व यंत्रणेची बैठक घेतली. बैठकीस आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. महेश लढ्ढा, डॉ. स्मिता लांडगे आदी मुख्यालयातून सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक व उपक्रमात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व सक्षम नागरिक म्हणून घडविण्याचा प्रयत्न होत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत असंतुलित आहार, घरगुती व पोषक आहाराकडे होणारे दुर्लक्ष, स्वच्छतेविषयीची उदासीनता, मोबाईल, संगणक, टीव्ही व सोशल मीडियाचा अतिवापर, शारीरिक हालचालींचा अभाव, झोपेच्या चुकीच्या सवयी, व्यसनाधिनतेकडे वाढणारा कल, मानसिक तणाव, चिंता, नैराश्य अशा विविध समस्या विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसून येत आहेत. तसेच किशोरवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक बदलांसोबत मानसिक व भावनिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या वयात योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व तज्ज्ञांचे सान्निध्य लाभल्यास विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळू शकते. यासाठी शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा विकसित करणारे केंद्र म्हणून कार्य करणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यशाळेतून काय साध्य होणार?
विद्यार्थ्यांमधील शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांचे वेळीच निदान, आरोग्य विषयक योग्य माहिती पोहोचविणे, किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन व मानसिक स्थैर्य निर्माण करणे, आरोग्यदायी सवयींचा अंगीकारण्यास प्रवृत्त करणे, व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याबाबत शास्त्रीय व प्रभावी मार्गदर्शन, शाळा, पालक व आरोग्य यंत्रणा यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करुन संतुलित आहार, पोषणमुल्य आहार सवयींचे महत्त्व,वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य याचे महत्त्व सांगणे,मोबाईल, संगणक व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे डोळे, मेंदू, झोप व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येणार आहेत.
दि.२८ रोजी एकाच दिवशी कार्यशाळा
जिल्ह्यात ज्या शाळांची पटसंख्या १०० वा त्यापेक्षा अधिक आहे त्या शाळांमध्ये मंगळवार दि.२८ रोजी सकाळी १० ते ११ यावेळात ही कार्यशाळा आयोजीत केली जाईल. शासकीय, निमशासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर व वैयक्तिक/समूह समुपदेशन देण्यात येईल. याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून संबंधित शाळा व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून ‘आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात येईल. गट शिक्षण अधिकारी (पंचायत समिती) यांनी त्यांच्या तालुक्यातील तसेच शिक्षण अधिकारी (मनपा) , जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक हे नियोजन करतील व आरोग्य विभाग तज्ञ डॉक्टर्सची उपलब्धता करुन देतील,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.








