सोयगाव, दि. २२ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यरत असलेल्या निवडणूक कार्यालयात अस्वच्छता आणि अपुरी व्यवस्था असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. कार्यालय परिसरात धूळ साचलेली असून प्रवेशद्वाराजवळ टाकलेला मुरुम न पसरविल्याने दिव्यांग महिला उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करताना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे निवडणूक विभागाच्या नियोजनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवरील प्रशासकीय इमारतीचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र, इमारतीत साफसफाई न केल्याने धूळ साचलेली दिसून आली. दि. २१ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तीन गट व सहा गणांसाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. उमेदवारांना ये-जा सुलभ व्हावी यासाठी कार्यालयाबाहेर गेटजवळ मुरुम टाकण्यात आला होता; मात्र तो नीट पसरविण्यात न आल्याने अडचणी निर्माण झाल्या.
विशेषतः बहुजन समाज पक्षाच्या आमखेडा गटातील दिव्यांग महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांना कार्यालयात प्रवेश करताना मोठी अडचण सहन करावी लागली. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा व उपाययोजना न केल्याने उपस्थित उमेदवार आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. कार्यालयातील धूळ व अस्वच्छतेमुळे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.
निवडणूक विभाग या त्रुटी दूर करून साफसफाई व आवश्यक व्यवस्था करणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















