शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात “हिंद दी चादर” (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.
श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.
श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार नाही, असे घोषित केले. पवित्र गुरू ग्रंथ साहिब यांना गुरूपद बहाल केले. या पवित्र गुरू ग्रंथ साहिबमध्ये श्री गुरू तेगबहादूर जी यांच्या 59 पद्यांचा व 57 श्लोकांचा अशा एकूण 116 रचनांचा समावेश आहे.
पवित्र ग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिबचा प्रारंभ श्री गुरू नानकदेवांच्या जपुजी साहिब वाणीने झाला. तर हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या श्लोकांनी समारोप. पवित्र गुरू ग्रंथ साहिब एक हजार 430 पानांचा आहे. पान क्रमांक एक हजार 425 ते एक हजार 428 यावर श्री गुरू तेगबहादूरजी यांचे मनाचे श्लोक अंकित आहेत. श्री गुरू तेगबहादूरजी (गुरूजी) यांच्या श्लोकांमध्ये साधकास परमेश्वर प्राप्तीसाठी मनाची कोणती अवस्था प्राप्त केली पाहिजे, याचे विवेचन आहे.
प्रस्तुत लेखात काही निवडक श्लोकांमधून मनास उपदेश, मोह, मायेपासून दूर जाणे, संस्कारित मन असणे अत्यावश्यक असल्याचे ज्ञान होते. आदर्श जीवन जगण्याची पद्धत समजते. गुरूजींच्या श्लोकांमधील विचार प्रत्येकाने आचरणात आणायलाच हवेत. त्यातून मानवाचे कल्याणच होणार. तसेच गुरूजींच्या वाणीतून जगाचे खरे स्वरूप, शाश्वत सत्य समजते.
माया किंवा मोह आपल्याला बांधून ठेवते, यावर श्री गुरू तेग बहादूरजींनी भाष्य केले आहे. त्यांच्या मते, जग आणि त्यातील सुख-दुःखे क्षणभंगुर आहेत.
जग रचना सभ झूठ है, जानि लेहु रे मीत ॥
कहि नानक थिरु ना रहे, जिउ बालू की भीत ॥ 49॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, “मित्रा, हे जग नश्वर आणि अस्थिर आहे. ज्याप्रमाणे वाळूची भिंत टिकत नाही, तसेच हे जगही टिकणारे नाही.”
जेव्हा आपल्याल हे सत्य समजते, तेव्हा आपण भौतिक मोहातून मुक्त होतो. ही समज आपल्याला सेवा आणि निःस्वार्थ कामाकडे वळवते.
श्री गुरू तेग बहादूरजींनी मानवी दुःखाची कारणे शोधली, त्यावर मात करण्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण संपूर्ण मनुष्य जीवनाचे कल्याण करणारी आहे.
1 मोह आणि अहंकारावर विजय
माणसाचा स्वार्थ, अहंकार त्याला सत्यापासून दूर नेतो. यावर विजय मिळवणारा माणूस स्वतःसोबत इतरांनाही तारतो.
जो प्राणी ममता तजै, लोभ मोह अहंकार ॥
कहु नानक आपन तरै, अउरन लेत उधार ॥22॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, जो माणूस लोभ, मोह, माया, ममता आणि अहंकार या विकारांचा त्याग केला तो स्वत: तर भवसागर तरून जातोच, एवढेच नव्हे तर इतरांचाही तो उद्धार करतो.
2. लोभ, क्रोधाचा त्याग
लोभ आणि राग नातेसंबंधांना तडा देतात. ज्याला सुख-दुःखाचा स्पर्श होत नाही, तो साक्षात ईश्वराचे रूप असतो.
सुख दुखु जिह परसै नही, लोभु मोहु अभिमानु ॥
कहु नानक सुनु रे मना, सो मुरति भगवान ॥13॥
अर्थ : गुरू नानक म्हणतात, ज्याला सुख-दुःख स्पर्शही करू शकत नाही, जो लोभ, मोह, अभिमान आदी विकारांपासून मुक्त आहे, तो जीव साक्षात ईश्वर स्वरूप आहे.
3. सुख-दुःखात स्थिर मन
आयुष्यात चढ-उतार येणारच. पण जो शत्रू आणि मित्र दोघांना समान मानतो आणि दुःखात खचत नाही, तोच खरा ज्ञानी.
हरखु सोगु जा कै नही, बैरी मीत समानि ॥
कहु नानक सुनि रे मना, मुकति ताहि तै जानि ॥15॥
अर्थ : गुरू नानक सांगतात, ज्याला हर्ष, शोक वेगळे वाटत नाहीत, जो शत्रू मित्र यांना समान मानतो, जो जीव मुक्त झाला आहे, असे समज.
4. भक्ती आणि नामस्मरण
सर्व संकटांतून मुक्त होण्यासाठी गुरूजींनी ईश्वराच्या नावाचे स्मरण करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.
राम नामु उरि मैं गहिओ, जा कै सम नहि कोइ ॥
जिह सिमरत संकट मिटै, दरसु तुहारो होइ ॥57॥
अर्थ : अंत समयी गुरू नानकजी म्हणतात “अरे मित्रा ! नामस्मरणमात्रे संकटे नष्ट होतात, आणि परमेश्वराचे- दर्शन होते ते रामनाम हृद्यात धारण कर. त्याच्या तोडीचे जगात अन्य काहीही नाही.”
हिंद-दी-चादर श्री. गुरू तेग बहादूरजींनी त्यांच्या कृती आणि आचरणातून सर्वांना अनमोल विचार दिला. त्यांचा विचार अंगीकारणे, आचरणात आणणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहेच. ‘कहु नानक सुन रे मना’ या वाक्यांद्वारे गुरूजी मनाला वारंवार अनेक दुष्कार्यापासून आपणास परावृत करून सत्कार्याशी जोडण्याचा संदेश देतात. असे गोड अमृत सर्व मानवाने चाखावे.
काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर यापासून मुक्तता म्हणजेच आत्मशुद्धी, सत्संग प्रधानता, जीवननिष्ठेत विधायकतेबरोबर अनाग्रही निवृत्ती, प्रपंच आणि परमार्थ, नामस्मरण यांचा सुमेळ ही गुरूजींच्या वाणीतील वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे विचार एका समाजापुरते नाहीत. तर ते सर्व मानव कल्याणाचे आहेत. मनाला संस्कारित करणारे आहेत. गुरूजींची वाणी सर्वांपर्यंत पोहोचावी. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे, शिकवणीचे अनुकरण ही काळाची गरज आहे. ते अमृत प्रत्येकाने चाखल्यास जीवनाचे नक्की सार्थक होईल.
– डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर
संदर्भ-
गुरू नानकांची वाणी जपुजी साहिब. (2006). मध्ये त. ग. विनायक लिमये. पुणे : तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त
ऐक रे मना ! ( तिसरी आ.). (2013). (त. ग. विनायक लिमये, अनु.) पुणे: तारासिंह गोरोवाडा, सिख धर्मप्रचार कमिटी, पुणे. 01 16, 2026 प्राप्त
***
















