खुलताबाद प्रतिनिधी होदेगेरी कर्नाटक ,होदपराक्रम, युद्धनीतीतील बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन आणि स्वतंत्र राज्यकारभाराचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात रोवणारे स्वराज्य संकल्पक, महाबली व महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना ३६२ व्या पुण्यतिथीनिमित्त आज २३ जानेवारी रोजी कर्नाटक राज्यातील होदेगेरी येथील समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती श्री. शहाजीराजे भोसले स्मारक समिती – कर्नाटक राज्य अध्यक्ष मल्लेशी शिंदे तसेच स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली.
२३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले, त्यानंतर देशभरातून उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची शहाजीराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित मनोगते, तसेच आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवभक्तांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची कर्मभूमी कर्नाटक राज्य असली, तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र वेरूळ – संभाजीनगर ही आहे. मालोजीराजे भोसले व उमाबाईसाहेब या मराठी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले शहाजीराजे भोसले अमाप शक्ती, युद्धकौशल्य आणि राजकीय दूरदृष्टीचे धनी होते. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वतीनेही कर्नाटकातील होदेगेरी येथे शहाजीराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा घेऊन देशभरामध्ये शिव कार्य करणार असल्याचे राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
दरवर्षी प्रमाणे हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यंदा कर्नाटकसह महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधीही या सोहळ्यास उपस्थित होते, तसेच कर्नाटक भाषेतील शिवगीते व भजनांचे विशेष आयोजन यावेळी करण्यात आले होते.
सध्या समाधी परिसरात सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे सुरू असून, समाधीलगत दोन एकर जागेचा व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. या जागेसाठी सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करण्यात आले असून, त्यामध्ये शिवभक्तांचे योगदान स्वीकारण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी राजेंद्र पवार यांनी वैयक्तिकरित्या एक लाख रुपयांचे योगदान दिले आहे. आगामी काळात शिवभक्तांच्या सहभागातून येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हजारो भाविकांसाठी अन्नदान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळेस कर्नाटक येथील शिवभक्तांचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला शहाजी महाराजांची जयंती 18 मार्च रोजी कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा संकल्प पुण्यतिथीच्या दिवशी घेण्यात आला हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते वेरूळ येथे साजरी होणारी शहाजी महाराजांच्या जयंती साठी समाधी स्थळावरून या ठिकाणचे विश्वस्त सहभागी होणार आहे अशी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले










