नांदेड : नुकत्याच जाहीर झालेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) परीक्षेच्या निकालात गोदावरी बी.कॉम बँकिंग या नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजच्या जगराजसिंघ संधू यांनी २०० पैकी १८५, शेख जुबेर यांनी १७८, प्रबज्योत सिंघ खालसा यांनी १७४ आणि नवज्योतसिंघ पुजारी यांनी १६९ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली असून, या यशामुळे कॉलेजच्या गुणवत्तेची उज्वल परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, जगराजसिंघ संधू यांनी नांदेड जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे कॉलेजच्या शैक्षणिक कामगिरीला अधिक उंची मिळाली आहे. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) ही अत्यंत शिस्तबद्ध, व्यावसायिक व बहुआयामी परीक्षा असून, कंपनी सेक्रेटरी या प्रतिष्ठित करिअरसाठी आवश्यक असलेले कौशल्य, कायदेशीर ज्ञान, आर्थिक समज आणि चालू घडामोडींचे सखोल आकलन विकसित करण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. सातत्यपूर्ण अध्यापन, नियोजनबद्ध अभ्यासक्रम, नियमित सराव, मार्गदर्शन आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळत आहे. तसेच संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आर.बी.आय. (RBI), एन.एस.ई. (NSE), बी.एस.ई. (BSE) आणि एन.एस.डी.एल. (NSDL) यांसारख्या आर्थिक क्षेत्रातील नामवंत संस्थांना अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून भेटी आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी बी.कॉम बँकिंग कॉलेजच्या संस्थापिका राजश्री पाटील यांनी कॉलेजचे संचालक अजय झरकर, प्रभारी प्राचार्य नेहा कुर्तडिकर, प्रा.उदयपासिंह लिखारी, प्रा.प्रताप पाटील, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी प्रसाद पाटील तसेच समस्त प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी निर्माण करण्यात आलेले सकारात्मक शैक्षणिक वातावरण आणि संघभावनेतून केलेले कार्य हेच या यशामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
















