लातूर, दि. 23 : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात ‘हिंद दी चादर’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि शौर्य यांची प्रभावी मांडणी केली.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणास लावले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आदर्शांचा आणि त्यांच्या अमर बलिदानाचा संदेश पोहचला. स्पर्धेत सादर केलेल्या गीतांमधून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट उलगडला गेला.
समग्र शिक्षा अभियानचे चंद्रकांत ठाकरे यांनी या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. तसेच संगीत शिक्षक विश्वजीत पांचाळ आणि शाहीर श्रीमती अॅड. अपेक्षा डाके यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
जिल्हा शिक्षण विभागाने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव, धार्मिक सद्भावना आणि बलिदानाच्या मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी सर्जनशील आणि उत्साहपूर्ण वातावरणात गीत गायनाचे कौशल्य सादर केले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त लातूर जिल्ह्यात विविध स्पर्धा आणि जनजागृती उपक्रम राबविले जात आहे. यानिमित्ताने राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित विशेष कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
















