सिल्लोड (प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळेगाव बुद्रक ता. सिल्लोड येथे मतदान जनजागृतीचा अभिनव उपक्रम
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात श्रीमती सरला कामे या निवडणूक कार्यांतर्गत स्वीप (SVEEP) कक्षात सक्रियपणे कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान १००% मतदान वाढविण्याच्या उद्देशाने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदान जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या सोबत असलेल्या बोलक्या बाहुल्या ‘गंगाराम’ आणि ‘गंगुबाई’ या ग्रामीण बोलीभाषेतून मतदारांशी संवाद साधत मतदानाचे महत्त्व अत्यंत सोप्या, विनोदी आणि प्रभावी पद्धतीने पटवून देत आहेत. या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साह निर्माण होत असून, नागरिक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
गावातील चौक, शहरातील विविध वार्ड, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा तसेच वर्दळीच्या परिसरात १००% मतदान करण्याचा संदेश पोहोचविण्यात आला. “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे”, “एकही मत वाया जाऊ देऊ नका” अशा संदेशांद्वारे मतदारांना प्रेरित करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमामुळे अनेक मतदार बंधू-भगिनींनी “आम्ही मतदान करणारच” असा ठाम निश्चय यावेळी व्यक्त केला.















