पुणे, तारीख २७ जानेवारी २०२६
गायिका अंजली भारती यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य धक्कादायक असून संपूर्ण मातृशक्ती, स्त्रीशक्तीचा अपमान करणारे आहे. एक गायिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या भारती यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्य योग्य नाही. अशात त्यांनी महिलांची माफी मागावी, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) केले.
एखाद्या स्त्रीवर अतिप्रसंग होणे, ही बाब समाज म्हणून आपले अपयश आहे. भंडारा येथे आयोजित एका कार्यक्रमात स्त्रीअत्याचारावर भाष्य करतांना अजंली यांच्या भावना विद्रोही आहे, पंरतु, एक महिला असतांना एखाद्या स्त्रीबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य करणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले. स्त्रीअत्याचारावर संताप व्यक्त करण्याऐवजी थेट अत्याचारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे विधान केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. हे वादग्रस्त वक्तव्य गुन्हेगारी रोखण्याऐवजी गुन्हेगारीलाच प्रोत्साहन देणारे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रकरणी आयोजक आणि भारती यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.अशाप्रकारचे विधान हे केवळ अशोभनीय नाही तर कायद्याच्या चौकटीबाहेर जाणारे असून, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याला अप्रत्यक्षरीत्या वैध ठरवण्याचा प्रयत्न आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता दाखवण्याऐवजी, एका निर्वाचित मुख्यमंत्र्याच्या पत्नीचा उल्लेख करून गुन्हेगारांना चिथावणी देणे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे पूर्णतः उल्लंघन असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची असे वादग्रस्त वक्तव्य करून पायमल्ली केली जात आहे,असे पाटील म्हणाले.
















