स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात सध्या जरी थोडासा कडवटपणा दिसत असला, तरी हे नातं अधिक घट्ट आणि गोड करण्यासाठी दुष्यंत मनापासून प्रयत्न करताना दिसणार आहे.
कृष्णा हाडाची शेतकरी आहे. मातीशी तिची नाळ अगदी घट्ट जोडलेली आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी कृष्णाचं शेतीवरचं प्रेम अनुभवलेलं आहे. एकीकडे शेतकरी असल्याचा अभिमान बाळगणारी कृष्णा आणि दुसरीकडे खेडेगाव, शेती आणि मातीविषयी तिटकारा असलेला दुष्यंत. या दोघांमधील विचारांचा संघर्ष प्रेक्षकांसाठी कायमच उत्सुकतेचा विषय ठरला आहे. मात्र हळूहळू कृष्णाच्या प्रेमामुळे आणि समजूतदारपणामुळे दुष्यंतचं मतपरिवर्तन होताना दिसत आहे. कृष्णाची मनधरणी करण्यासाठी दुष्यंतने याआधीही अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र यावेळी तो एक पाऊल पुढे टाकत चक्क तिच्यासोबत शेती करण्यासाठी सज्ज झालाय. मातीशी प्रत्यक्ष नातं जोडण्याचा हा प्रवास दुष्यंतच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे.
या खास प्रसंगाबद्दल दुष्यंतची भूमिका साकारणारे अभिनेता अभिषेक रहाळकर म्हणाला,’ दुष्यंतच्या मनात मातीबद्दल जी भीती होती, ती कृष्णामुळे हळूहळू दूर होत आहे. त्याची मातीशी नाळ जोडली जात आहे. कृष्णाची मनधरणी करण्यासाठी आता तो शेतात तिच्यासोबत काम करणार आहे. कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यातले खूप छान क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. मला शेतकऱ्यांबद्दल अतिशय आदर आहे. आपली भूक भागवण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत असतात. एक अभिनेता म्हणून मी स्वतःला नशिबवान समजतो की मालिकेच्या निमित्ताने का होईना, मला शेतकऱ्यांचं आयुष्य अनुभवायला मिळत आहे. तेव्हा दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यातील हा भावनिक वळण अनुभवायला विसरू नका. नक्की पहा हळद रुसली कुंकू हसलं दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
















