छत्रपती संभाजीनगर, दि.२७ : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर दर्जेदार चित्रपटाच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन व नितीमूल्यांची शिकवण देण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’चित्रपट रसास्वाद’ विषयक कार्यशाळा मंगळवारी (दि.२७) घेण्यात आली. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी ’एमजीएम’ फिल्म इन्टिटयूटचे संचालक डॉ.शिव कदम, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. महात्मा फुले सभागृहात आयोजित या कार्यशाळेस विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, सिनेमा हे अत्यंत गंभीर व प्रभावी जनजागृतीचे माध्यम आहे. माणसाच्या जडणघडणीतील कला, साहित्य, संस्कृती या क्षेत्राचे महत्व आहे. सत्यजित राय, श्याम बेनेगल, व्ही.शांताराम यांनी सामाजिक विषय अत्यंत चांगल्यारितीने चित्रपटातून हाताळले. ’शोले’ सारखा चित्रपट मैलाचा दगड असून तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असेही ते म्हणाले. अजिंठा-एलोरा चित्रपट महोत्सव ख-या अर्थाने ’ग्लोबल’ झाल्याचे ही ते म्हणाले. तर चित्रपट हे अत्यंत प्रभावी लोक माध्यम असून गांर्भीर्याने पाहण्याची गोष्ट आहे, असे डॉ.शिव कदम म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ.प्रशांत अमृतकर यांनी विविध चित्रपटांचा आस्वाद घेतल्याबद्दल उदाहरणासह माहिती दिली. यावेळी अॅड.जयेश वाणी, निलीमा जोग यांची उपस्थिती होती.
अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यशाळा घेण्यात आल्याचे डॉ.वैâलास अंभुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यशाळे पुर्वी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची भेट घेऊन संवाद साधला. विद्यापीठात ललित कला अकादमी व लोककला महोत्सव या दोन उपक्रमांना मा.कुलगुरु यांच्या कार्यकाळात गती मिळाल्याबद्दल चंद्रकांत कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले.
















