नांदेड, दि. 24 :‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित भव्य धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमात मानवतेचा आणि सेवाभावाचा प्रत्यय देणारी नेत्रसेवा सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. बदलापूर जि. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘देवाभाऊ चष्मा सेवे’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून, नेत्रतपासणीसाठी दिवसभर रांगा लागत आहेत.
‘देवाभाऊ चष्मा’ या सेवेत मोफत नेत्रतपासणी करण्यात येत असून, गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटपही केले जात आहे. वृद्ध, महिला, कामगार, शेतकरी, विद्यार्थी अशा विविध घटकांतील हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेकांना पहिल्यांदाच व्यवस्थित नेत्रतपासणीची संधी मिळाल्याने नागरिकांकडून समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे.
‘सेवा हाच खरा धर्म’ या भावनेतून साकीब गोरे यांनी ही नेत्रसेवा सुरू केली आहे. हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो भाविक नांदेडमध्ये दाखल होत असताना, त्यांच्या आरोग्याची विशेषतः डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ओळखून ही सेवा उभारण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे चष्मा न घेऊ शकणाऱ्या अनेक गरजूंना या माध्यमातून नवा दृष्टीकोन मिळत आहे. गर्दी असूनही सेवा सुरळीतपणे सुरू आहे. महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सहकार्य करण्यात येत आहे. नागरिकांकडून साकीब गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
श्री. साकीब गोरे म्हणाले, आपण ३४ वर्षापासून ही नेत्रसेवा करत आहे.आजपर्यंत 37 लाख नागरिकांची नेत्रतपासणी केली आहे.17 लाख नागरिकांना चष्मे मोफत पुरविण्यात आली आहेत.63 हजार मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.
















