शहापूर :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली दिनांक २१ जानेवारी रोजी पालघरमध्ये ५०,००० लोकांनी काढलेल्या मोर्चाच्या विजयानंतर, आज २५ जानेवारी रोजी नाशिकमध्ये माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली ४०,००० शेतकऱ्यांचा आणखी एक भव्य मोर्चा सुरू झाला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माकपचे माजी केंद्रीय समिती सदस्य आणि किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे केंद्रीय समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य आणि सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य आणि नाशिक जिल्हा सचिव इंद्रजित गावीत, माकपचे राज्य समिती सदस्य आणि किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख आणि इतर अनेक जण करत आहेत.
पालघरमधील संघर्षाप्रमाणेच नाशिकमधील संघर्षही दोन मुख्य मुद्द्यांवर आधारित आहे.
पहिला मुद्दा वनाधिकार कायदा (FRA) आणि पेसा (PESA), सिंचन योजना, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारो रिक्त जागा भरणे इत्यादींबाबत पूर्वी दिलेल्या अनेक आश्वासनांची अंमलबजावणी न करण्याशी संबंधित आहे.
दुसरा मुद्दा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारांच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांशी संबंधित आहे, जसे की स्मार्ट मीटर योजना, मनरेगा आणि ग्रामीण रोजगाराला सुरुंग लावणे, सरकार-कॉर्पोरेट युतीद्वारे जमिनींवर कब्जा करणे, चार श्रम संहिता लादणे इत्यादी प्रश्नांबाबत हा लॉग मार्च मोर्चा काढण्यात आलेला आहे.














