विशेष प्रतिनिधी – मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल दरम्यान,नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित मंत्री महाजन यांच्यासमोर उपस्थित केला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. तसेच,वनरक्षक कर्मचारी महिलांकडून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.














