१ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गितांवर सामुहिक कवायत
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका) – जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी एकाच सुरात महाराष्ट्र गीताचे समूहगान सादर करताना, देशभक्तीपर गीतांवर शिस्तबद्ध आणि समरस अशा सामूहिक कवायत संचलनातून राष्ट्रभक्तीची जिवंत अनुभूती दिली. विद्यार्थ्यांच्या आवाजात उमटलेले महाराष्ट्र गीत आणि त्यांच्या पावलांतून व्यक्त झालेली शिस्त, एकात्मता व देशप्रेम यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले. प्रजासत्ताक दिनानिमित्त (सोमवार, दि.२६) या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. राज्यातील १ लाख शाळांमध्ये ७ लाख शिक्षक व २ कोटी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘संस्कार दशसुत्रीचे, रंग देशभक्तीचे’ या शिर्षकानंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यात १ लाख ५० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील असे नियोजन होते मात्र प्रत्यखात १ लाख ८५ हजार विद्यार्थी सहभागी झाल्याचे संयोजकांनी सांगितले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या दशसूत्री उपक्रमांतर्गत ‘राष्ट्रभक्ती जागृत करणे’ या महत्त्वपूर्ण सूत्राचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राष्ट्रप्रेम केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून व्यक्त व्हावे, या मुख्य हेतूने हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुका स्तरावर मुख्यालयासह विविध ठिकाणी शाळांमधील विद्यार्थी एकत्र येऊन एकाच देशभक्तीपर गीताच्या तालावर शिस्तबद्ध कवायत सादर करणार आली. शिस्त, समन्वय, संघभावना आणि राष्ट्रध्वजाप्रती आदर यांचे प्रभावी दर्शन या सामूहिक कवायत संचलनातून घडले.
या उपक्रमाची अधिकृत नोंद Asia Book of World Records आणि India Book of World Records या मान्यवर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये करण्यात आली, ही गौरवास्पद बाब ठरली. जिल्ह्यात प्रत्येक तालुका मुख्यालयी तसेच जिल्हा मुख्यालयी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य सोहळा राजे संभाजी सैनिक विद्यालय, कांचनवाडी येथे आयोजीत करण्यात आला. या सोहळ्याला विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सौ. अश्विनी लाठकर तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होते. विक्रमाची नोंद करण्यासाठी श्रीमती रेखा सिंग या व त्यांची टीम उपस्थित होती.
शानदार कवायत नंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमाची व तेथील सहभागाची नोंद घेऊन मग विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना Asia Book of Records, तर शिक्षणाधिकारी (माध्य) अश्विनी लाठकर यांना India Book of Records पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याचबरोबर, राज्यभरात शासकीय ध्वजारोहणानंतर एकाच वेळी अडीच कोटी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन सादर करत World Book of Records LONDON मध्ये नोंद करून एक भव्य विश्वविक्रम प्रस्थापित केला.













