नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यानिमित्ताने मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की भारतीय संविधान देशातील सर्व प्रकारच्या जनतेस जगण्याचे – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हक्क व अधिकार प्रदान करते. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देखील प्राप्त होते. याचा लाभ घेत असतांना आपण सर्वांनी आपली कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे व मेहनतीने पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची माहिती देखील दिली. त्यात प्रामुख्याने नवीन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख, कृषी विज्ञान केंद्राचे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षणक्रम यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली सुरु असलेला महाज्ञानदीप प्रकल्प, वाढवन बंदर साठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु झालेले शिक्षण – प्रशिक्षणाचे काम, शेतकरी वर्गास एआय तंत्रज्ञान आधारित दिले जात असलेले शिक्षण, सामाजिक बांधिलकी म्हणून बंदिवान, तृतीयपंथी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवक युवती यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे सुरु असलेले विशेष उपक्रम यांची देखील त्यांनी माहिती दिली. सन २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करुया असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतन व सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, शेतमजूर आदी उपस्थित होते.













