छत्रपती संभाजीनगर – शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो.
‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत.
चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत.
चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे यांनी सांभाळली आहे.
















