दिनांक : २५ जानेवारी २०२६ |
नांदेड :- “हिंद-दी-चादर” शहीदी समागमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देत केशरी पगडी परिधान करून दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डतर्फे यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.
गुरुद्वाराच्या सुवर्णमय वास्तूतून, श्रद्धेच्या शांत पावलांनी केशरी पगडी परिधान करून चालताना अजितदादांचा तो क्षण छायाचित्रात कैद करण्यासाठी छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी हाक दिली—
“दादा…”
क्षणभर थांबत, चालत-चालतच त्यांच्या खास शैलीत अजितदादांनी दिलेले उत्तर आजही कानात घुमते—
“काय रे, कसा आहेस ?
पगडी बरोबर बसली ना…”
तो क्षण केवळ एक छायाचित्र नव्हता,
तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवादाचा जिवंत दस्तऐवज होता.
आज, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीने तीच आठवण पुन्हा अस्वस्थ करते. केशरी पगडीतील ते चालते पाऊल, तो हसरा प्रश्न आणि छायाचित्रकाराशी झालेला तो अनौपचारिक संवाद—आता स्मृतींमध्येच उरला आहे.
केशरी पगडीतील ती छबी आज केवळ फ्रेममध्ये नाही, तर प्रत्येक संवेदनशील छायाचित्रकाराच्या मनात कोरली गेली आहे.
















