ता.२८ :- पिंपरी चिंचवड येथील चिखली पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे हे फेब्रुवारी २०१४ मध्ये पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पहिली नियुक्ती झाली.अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात ‘सी-६०’ या कमांडो पथकात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली.त्याबद्दल वेगवर्धीत पदोन्नती मिळून ते सहायक पोलिस निरीक्षक झाले.फडतरे यांनी आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत ठेवला.त्यामुळे २०२२ मध्ये पुन्हा वेगवर्धीत पदोन्नती मिळून ते पोलिस निरीक्षक झाले.पोलिस उपनिरीक्षक असलेले फडतरे यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पोलिस निरीक्षक पदापर्यंत त्यांना पदोन्नती मिळाली.त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत त्यांची चिखली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक (गुन्हे) नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान २०२१ मध्ये पोलिस महासंचालक अंतरिक सेवा पदक, खडतर सेवा पदक मिळाले आहे. यासह यापूर्वी फडतरे यांना २०२१ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२३ मध्ये राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ मिळाले होते.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर–बोरिया जंगल परिसरात एप्रिल २०१८ मध्ये नक्षलविरोधी कारवाई अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन राबवण्यात आले.यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सी-६०’ची दोन पथके सहभागी होती. या कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांनी केले.२०१८ मधील या कामगिरीची दखल घेत फडतरे यांना पुन्हा राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर करण्यात आले आहे.हे पदक दोनदा मिळविल्याने पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
















