शहापूर/ प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तंटामुक्ती तथा हागणदारी मुक्त ग्राम सन्मानित टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनंदाताई कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसरपंच होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सदस्या असलेल्या सुनंदाताई गायकवाड यांच्या निवडीमुळे गावातील अनेक प्रलंबित विकासकामे जलद मार्गी लागतील, असा विश्वास सरपंच सुहास केंबारी यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल गावात सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विशेषतः महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडीप्रसंगी माजी सरपंच दिलीप केंबारी, शरद केंबारी, माजी उपसरपंच सुरेश जाधव, अभय केंबारी, धनाजी टोहके, ग्रामपंचायत सदस्य संजय केंबारी, नंदा केंबारी, शुभांगी पवार, मंगला खुटारे, तसेच राजेश केंबारी, दामोदर जाधव, भगवान जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेविका ज्योती पवार, अंगणवाडी सेविका मोनिका केंबारी तसेच गावातील महिलांनी सुनंदाताई गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले. प्रथमच महिला उपसरपंचपदाचा मान मिळाल्याने गावातील महिलांमध्ये आत्मविश्वास व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
















