गंगापूर :- वाहेगाव येथील जामा मस्जिदकडे जाणारा तब्बल १३ वर्षांपासून बंद असलेला रस्ता अखेर खुला करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब हिवाळे यांच्या पुढाकारामुळे हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. सामाजिक सलोखा, संवाद आणि सर्व समाज घटकांना सोबत घेण्याच्या भूमिकेमुळे हा वाद शांततेत सुटला.
दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर सदर रस्ता अधिकृतपणे खुला करण्यात आला. यावेळी आप्पासाहेब हिवाळे यांनी या रस्त्यावर तातडीने टेवर ब्लॉक बसवण्याचे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ती सर्व विकासकामे करण्याचे आश्वासन दिले.
रस्ता खुला झाल्याने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने मुस्लिम समाजाच्या वतीने आप्पासाहेब हिवाळे, चिंतामण हिवाळे, सरपंच सुदाम भडके, नितीन हिवाळे व दौलत महाराज मनाळ यांचा सत्कार करण्यात आला. हा निर्णय सामाजिक एकोपा आणि परस्पर विश्वासाचे उत्तम उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यासाठी सुदाम भडके, कल्याण हिवाळे, विष्णू मनाळ, महेश मनाळ, ऋषिकेश मनाळ, संजय पगारे, अनंत भडके, बाबासाहेब मनाळ व भाऊराव पारदे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हाजी अहमद मन्सूरी यांनी हिवाळे बंधूंचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमास जामा मस्जिदचे अमीर गफ्फार पठाण, शमशुद्दीन शेख, राजू शेख, मजीद पठाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे गावातील सामाजिक सलोखा अधिक दृढ होईल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.
















