नांदेड, दि. 24 : शहरातील मोदी मैदानाच्या भव्य 52 एकर परिसरात सुरू असलेल्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त शीख समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे ‘विरासत-ए-सीख’ हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन भाविकांसाठी आकर्षण ठरत असून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले भाविक आवर्जून प्रदर्शनाला भेट देत आहेत.
शीख धर्माच्या स्थापनेपासून ते गुरू गोविंद सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व गुरूंचा इतिहास, त्यांनी दिलेले योगदान सचित्र स्वरूपात मांडण्यात आला आहे. विशेषतः हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासोबत शीख योद्ध्यांनी वापरलेली विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शन दालनात ठेवण्यात आली आहेत. शीख धर्माचे पहिले गुरु श्री गुरु नानक जी ते शेवटचे गुरु गोविंद सिंगजी यांचा इतिहास व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे कार्य तसेच शीख धर्मासोबतच सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाजातील महापुरुषांचाही इतिहास या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला आहे.
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागमनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले भाविक आवर्जून ‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनाला भेट देत आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाचे दालन भाविकांनी तुडुंब भरल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आज, 25 जानेवारी 2026 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
▪️शीख योद्ध्यांनी वापरलेले शस्त्रात्रे पाहण्याची संधी; प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
▪️शीख समाजासह नऊ समाजातील महापुरुषांच्या इतिहासाची सरल आणि सोप्या भाषेत सचित्र मांडणी
















