स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चितेचा अग्नी शांत होत नाही तोवर संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे केलेली हीणकस टीका त्यांच्या गिधाडी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. राज्यातला प्रत्येक माणूस अजितदादांच्या अकाली निधनाने शोकाकुल असताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून राऊतांनी जाणीवपूर्वक त्यांची बदनामी केली. या दु:खद प्रसंगी हीन वृत्ती दाखवणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनतेने घरी बसवल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या राऊतांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मित्र पक्षाला कशा पद्धतीने वागणूक द्यायची हे भाजपाला ठाऊक आहे. आपल्या सच्च्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय जनता पार्टी जाहिरात देत असेल तर राऊतांच्या पोटात दुखण्याचे कारण काय असा परखड सवाल करत श्री. बन म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि राऊतांनी सत्तेसाठी मित्रपक्ष भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. सिंचन घोटाळा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि कोर्टाच्या व चौकशी समितीच्या वतीने निर्णय देऊन अजितदादांना न्याय दिला जाईल असेही श्री. बन म्हणाले.
विमान अपघाताचा तपास योग्यरित्या गतीने होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री श्री. नायडू यांना पत्र लिहून अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. केंद्रीय मंत्रालयाने चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. एवढेच काय तर सीआयडी चौकशी देखील करण्यात येणार आहे. संजय राऊत या प्रसंगातही राजकारण करण्याची संधी सोडत नाहीत हे दुर्दैवी आहे असा प्रहार श्री. बन यांनी केला.
राऊतांनी या दु:खद प्रसंगी राजकारण करू नये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसाचा शासकीय दुखवटा आहे. अशा परिस्थितीत महापौर निवडीची घाई राऊतांना झाली आहे. शासकीय दुखवटा असताना महापौरपदासाठी बैठका घेणे, महापौर आमचा का तुमचा याबद्दल चर्चा करण्याची हीन वृत्ती राऊतांची आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा भाजपा महायुतीचा होईल, पुढच्या आठवड्यामध्ये त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. जवळपास 25 महापालिकांमध्ये शिवसेना आणि महायुतीचा महापौर बसेल असेही श्री. बन म्हणाले. तसेच दोन राष्ट्रवादी एकत्र होतील की नाही तसेच सुनेत्रा पवार की पार्थ पवार पक्षाची धुरा सांभाळणार याबाबत वक्तव्य करण्याची ही वेळ नाही असेही श्री. बन यांनी राऊतांना आणि उबाठा गटाला सुनावले.
महायुती सरकारमध्ये महिला सक्षमीकरणाला प्राधान्य
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देते. त्यामुळे ही योजना सुरूच रहाणार. या योजनेमुळे महिला स्वयंपूर्ण होत आहेत, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होत आहे याचा जास्त आनंद भाजपाला असल्याचेही श्री. बन म्हणाले.
विरोधी पक्ष नेते पदावर राऊतांनी अधिकार सांगू नये
राज्याला विरोधी पक्षनेते पदासाठी कायदा आणण्याची गरज नाही. मतदारांनी महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता न देण्याचे काम केले आहे. उबाठा गट आणि विरोधकांना त्यांची खरी जागा मतदारांनी दाखवून दिली त्यामुळे उबाठा गटाची विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची पात्रताच नाही असे टीकास्त्र श्री. बन यांनी सोडले.














