सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या किल्ल्या आहेत. या किल्ल्यांवर जर चुकीच्या लोकांचा ताबा गेला, तर गावांचा विकास खुंटेल. त्यामुळे मतदारांनी कुठलाही गैरसमज न ठेवता शिवना गटात परिवर्तन घडवून आणत शिवना गटाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे, असे अवाहन करीत आमदार अब्दुल सत्तार यांनी केले .
शिवसेनेच्या या जंगी कॉर्नर सभेत आमदार सत्तार यांनी थेट विरोधकांवर तोफ डागली. फक्त निवडणुकीच्या तोंडावर गावात फिरणारे आणि निवडणूक झाली की जनतेकडे पाठ फिरवणारे लोक पुन्हा डोके वर काढत आहेत, ग्रामीण जनतेला फसवण्याचे काम विरोधक सातत्याने करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, रस्ते, पाणी, आरोग्य, शाळा, रोजगार यांसारख्या प्रश्नांसाठी आमदार म्हणून मी कधी उणिवा भासू दिली नाही. शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात विकास झाला, हे जनता विसरलेली नाही. जनतेच्या करातून आलेला पैसा विकासासाठीच वापरला पाहिजे, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, हे शिवसेनेचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, शिवसेनेचे उमेदवार हे उच्च शिक्षित तसेच विकासाभिमुख असून जनतेच्या दुःखात उभे राहणारे कार्यकर्ते आहेत. संकटात धावून येणारे आहेत. हे जनतेला नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिवना जिल्हा परिषद सर्कल मधील धोत्रा, पानवडोद बुद्रुक, डीग्रस , आमसरी, वाघेरा , मादनी येथे झालेल्या कॉर्नर सभेला शिवसेनेचे पदाधिकारी माजी जि. प. सदस्य मुरलीधर काळे, भिका वाघ, राजू बाबा काळे, कृउबा समितीचे उपसभापती संदीप राऊत, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कु. निकिता राजेंद्र काळे, पंचायत समिती गणाच्या उमेदवार नेहा प्रेम साळवे, शेख भिकन आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ , मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















