मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अखेर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्या सायंकाळी त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावी, अशी पक्षातून जोरदार मागणी होत होती. पक्षातील प्रमुख नेत्यांच्या आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिल्याचे समजते.
दरम्यान, अजित पवार यांच्या जाहिरात व जनसंपर्क कार्याचे काम पाहणाऱ्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सकारात्मक निरोप घेऊन ते मुंबईत परतल्याचे सांगण्यात येते.
अजित पवार यांच्या अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदासह वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास आणि क्रीडा ही महत्त्वाची खाती सांभाळत होते. आता सुनेत्रा पवार उद्या लोकभवन येथे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती झाल्यास त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरण्याची शक्यता असून राज्याच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
















