देगलूर : तालुक्यात हणेगाव येथील बसस्थानक परिसरातील आच्यारे ज्वेलर्स या दुकानात मध्यरात्री चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न मरखेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. या प्रकरणी पोलिसांनी एका चोरट्यास ताब्यात घेतले असून दोन चोरटे फरार झाले आहेत.
दिनांक ३१ जानेवारी शनिवार रोजी तीन चोरट्यांनी आच्यारे ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्हि कॅमेरे वर काळा स्प्रे मारण्यात आले. त्यांनी दुकानातील तिजोरी फोडून सोने, चांदी व रोख रक्कम पिशवीत भरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना रात्रगस्त घालत असलेले मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार यांना आच्यारे ज्वेलर्स दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे व दुकानासमोर एक व्यक्ती रेकी करत असल्याचे दिसले. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विलास पवार व त्यांचे सहकारी दुकानाकडे जात असताना पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून सेवकसिंग रघुविरसिंग तिलपले, वय २२ वर्ष, राहणार हनुमानगल्ली, ता.उमरी यास ताब्यात घेतले, तर सद्दाम वय २७ व सोहेल वय २५ वर्ष राहणार ता.उमरी हे दोन पसार झाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून सोने, चांदीसह रोख रक्कम ३० हजार ७९० रुपये असे एकूण ७ लाख ४५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दुकानमालक अमित राजकुमार आच्यारे यांना संपर्क करून बोलावले. त्यानंतर आरोपीला मरखेल पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. मारखेल पोलिसांच्या या धाडसी कारवाईवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पथकातील पोलिसांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस घोषित केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पवार हे करत आहेत.









