छत्रपती संभाजीनगर : डाक विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शन CSNPEX-2026 हे दि. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी कैलास शिल्प, सांस्कृतिक सभागृह, टी.बी. सेंटर येथे अती उत्साहात, जल्लोषात व विक्रमी प्रतिसादात संपन्न झाले. या भव्य प्रदर्शनास शहरातील नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच टपाल तिकीट संग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या प्रदर्शनात शहर व जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. यामध्ये निबंध स्पर्धेसाठी २५० विद्यार्थी, क्विझ स्पर्धेसाठी ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
तसेच निबंध, क्विझ व टपाल तिकीट रचना (Stamp Design) स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनुक्रमे ३, ३ व ४ स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्रदर्शनात १८५४ पासून आजपर्यंतची देश-विदेशातील अत्यंत दुर्मिळ, ऐतिहासिक व संग्रहणीय टपाल तिकिटे मांडण्यात आली होती. भारतीय संस्कृती, स्वातंत्र्यलढा, थोर व्यक्तिमत्त्वे, कला-शिल्प, जैवविविधता, विज्ञान व सामाजिक विषयांवर आधारित टपाल तिकिटांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यावेळी My Stamp स्टॉल हे प्रमुख आकर्षण ठरले, ज्यामध्ये नागरिकांनी स्वतःचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेण्याचा अनोखा व संस्मरणीय अनुभव घेतला.
प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ३० ज्येष्ठ व मान्यवर फिलाटेली संग्राहकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगर पोस्ट विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत नियोजनबद्ध व परिश्रमपूर्वक कार्य केले.
कार्यक्रमास डॉ. अजिंक्य काळे, मा. श्री जी. हरिप्रसाद, मा. श्री सुरेश एल. बन्सोडे (सीनियर पोस्टमास्तर), मा. मासूम पटेल, मा. श्री मामिडवार, मा. श्री निवृत्ती तोडकर यांच्यासह सहदेव सातपुते, अनिल शेळके, विनय चामणीक, सुनील कोळे, संजय पाटील, प्रकाश अहिरे तसेच पोस्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
CSNPEX-2026 प्रदर्शनामुळे नव्या पिढीत इतिहास व संस्कृती जपण्याची जाणीव अधिक दृढ झाली असून फिलाटेलीचा छंद पुन्हा एकदा जनतेच्या केंद्रस्थानी आला आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शहरात प्रथमच एवढ्या व्यापक स्तरावर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाने छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात एक नवा, ऐतिहासिक अध्याय जोडला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
















