नागपूर, दि. १ फेब्रु. २०२६ : कविता ही केवळ भावनांची अभिव्यक्ती नसून समाजाचे आरसेपण जपणारे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. याच विचारातून कविता म्हणजे प्रबोधन या संकल्पनेतून संगमनेर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महोत्सव कवितांचा’ या भव्य काव्य संमेलन व सन्मान सोहळ्यात नागपूर येथील साहित्यिक-कवी प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा सन्मान करण्यात आला. हा साहित्यिक व सांस्कृतिक सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री कचेश्वर देवस्थान मंदिर, बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला. या महोत्सवासाठी संगमनेर, राहुरी, पारनेर, जुन्नर, नागपूर आणि अकोला या विविध तालुक्यांमधून निवडक साहित्यिक, कवी, विचारवंत आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. काव्यसंमेलनात प्रवीण बागडे यांनी सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयपूर्ण व संवेदनशील ‘असत्य कथा’ या विषयावर तसेच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणासाठी दोन्ही कवींना पुष्प, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल साहित्यिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आधुनिक गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे डॉ. हरिभाऊ उगले उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून कृषी उपसंचालक श्री प्रविण गवांदे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. सामाजिक प्रश्नांवरील परखड मांडणी, प्रखर शब्दशैली आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन यामुळे त्यांच्या कविता वाचक-श्रोत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या सशक्त सहभागामुळे ‘महोत्सव कवितांचा’ या साहित्यिक उपक्रमाची उंची अधिक वाढली असून साहित्यप्रेमी व रसिकांकडून त्यांच्या कार्याचे स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कवितेच्या जोरावर सामाजिक जाणीव जागृत करण्याचा तसेच नव्या साहित्यिक प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौतम वाघमारे, निवृत्ती कानवडे महाराज, प्रताप गुंजाळ, नवनाथ सरोदे आणि रवि काशिद यांनी विशेष परिश्रम घेतले.
















