छत्रपती संभाजीनगर दि.५ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी भाषेला शिक्षणात मोठे प्राधान्य मिळाले आहे. मराठीत ई-कंटेंट आणि डिजिटल शिक्षण सामग्री तयार करण्याची मोठी संधी आहे, ज्यामुळे तांत्रिक शिक्षण सोपे होण्यास मदत होणार आहे. मराठी भाषेला केवळ संवादाचे माध्यम न ठेवता ज्ञान, शिक्षण व करिअरसाठी सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित विशेष व्याखान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमजीएम कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, डॉ.वीरा राठोड, संचालक प्रो. के.पी.सिंग,प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्या डॉ.शेळके म्हणाल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विधी आदि विद्याशाखांमध्ये मराठीतून शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. येत्या काळामध्ये मराठी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध करियरच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मराठी भाषेमध्ये करिअर करण्यासाठी अनेक माध्यमे आता उपलब्ध होत असून मराठी भाषा देखील जागतिक होत आहे. करिअर करण्यासाठी येणाऱ्या काळात मराठी भाषा निश्चितपणे दिशादर्शक ठरणार असल्याचे डॉ.वीरा राठोड यांनी सांगितले.
यावेळी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी सकाळचा पिंगळा-वासुदेव, शेतकरी गीत, सण वार, मराठवाडा गीत, आदिवाशी गीत, आम्ही ठाकर, कोळीगीत बंजारा गीत, दिंडी भारुड, दोनच राजे इथे गाजले, पोवाडा, गवळण, बतावणी, लोकनाट्य, वाघ्या मुरळी,जलसा, पोतराज, जोगवा, गोंधळ आदि कला प्रकार सादर करण्यात आले.
या भाषिक पंधरवड्यामध्ये पवन परमेश्वर शेळके, शिवराज रामेश्वर, रसिका मयुर पाडळकर, सलोनी सुनील कापसे, दृष्टी दीपक देशमुख, तेजल प्रमोद देशमुख, प्रेरणा विजय बोरकर, वैष्णवी रवींद्र जाधव, आसावरी योगेश कुलकर्णी, हरि ओम कराड, चैत्राली सतीश वऱ्हाडे, ऋचा सारंग बक्षी, रितेश प्रकाशराव देशमुख, चैताली संग्राम लांडगे, कुणाल दत्तात्रय बनकर, अपर्णा तडस आदि कलावंत विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मारोती गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.राम गायकवाड यांनी मानले.
















