छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (प्रतिनिधी) – २१ सप्टेंबर २०१२ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या शासकीय कर्करोग रुग्णालय आता १३ वर्षांचे झाले आहे. जसे वय वाढत आहे त्याच गतीने सुविधा व सेवांचा वेग वाढल्याने १५ आक्टोबर २०१६ रोजी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. आता कर्करोग रुग्णालयाच्या १३ वर्षांच्या परिश्रमाचे चीज होत असल्याची भावना अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केली. जागतिक कर्करोग दिननिमित्त ‘प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, डॉ. अनघा वरुडकर, डॉ. बालाजी शेवळकर, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. अंजली वासाडीकर, मॅट्रन मंदाकिनी ठोकळ, प्रशासकीय अधिकारी मोरे, डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. प्रमोद धनजकर, डॉ. धनश्री कुदळ, डॉ. सुयश डिग्गीकर आदी उपस्थित होते. तसेच रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. रोटरी क्लबचे मान्यवर रोटेरियन सतीश लोणिकर, सुरज दुमणे आदी देखील उपस्थित होते. जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन किड्स सेवाभावी संस्थेमार्फत सकाळी बेगमपुरा परिसरात कर्करोग जनजागृतीसाठी दीड किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्करोग रुग्णालयात करुणा रुग्णसंवाद व सहायता केंद्र हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून, दररोज सकाळी विशेष कार्य अधिकार्यांच्या उपस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्करोग प्रतिबंधक विभागाचे डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांनी केले. त्यांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली. तसेच जानेवारी महिन्यात सहा शाळांमध्ये कर्करोग जनजागृती व तंबाखू नियंत्रण मोहिमा राबविण्यात आल्या असून, त्याचा लाभ सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रश्न तुमचे – उत्तर आमचे या उपक्रमांतर्गत रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना कर्करोगासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेत आपले अनुभव मांडले. कार्यक्रमादरम्यान परिचारिका कर्मचार्यांनी कर्करोग जनजागृतीसंदर्भात तयार केलेली माहितीपर पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली. विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी यंदाच्या युनायटेड बाय युनिक या जागतिक कर्करोग दिनाच्या धोरणा विषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैशाली भिवसाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भडांगे, बालाजी देशमुख, इंदल जाधव, सतीश खरात, सिद्धार्थ जाधव व खरात यांनी परिश्रम घेतले.
















