पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चले जाव’ असे तोंड वर करून बरळणा-या उबाठा गटाचे संजय राऊत आणि उबाठा गटाला मतदारांनी वारंवार नाकारून ‘चले जाव’ असा स्पष्ट आदेश दिला आहे असा जोरदार टोला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी लगावला. पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेणा-यांना मतदारांनीच घरी पाठवले आहे. विधानसभेला 90 पैकी 20 जागा आणि मुंबईसह 25 महापालिकांमध्ये उबाठा गटाला पदरी पडलेला भोपळा हा जनतेचा ‘चले जाव’ आदेशच आहे, असे श्री. बन म्हणाले.
अमेरिकेच्या आदेशावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली या राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देत श्री. बन म्हणाले की अशा फुटकळ आरोपांनी राऊतांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. सर्वसमावेषक विकास, सुरक्षा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि भाजपा महायुती सरकार देते हा विश्वास मतदारांना असल्याने विधानसभा, नगर पालिका, महापालिका निवडणूकीत मतदारांनी उबाठा आणि काँग्रेसला जागा दाखवून दिली आहे.
महिला छळाच्या पाटकर फाइल्सबद्दल बोला
एपस्टीनच्या मुद्द्यावर भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की एपस्टीन फाइल्सशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा काहीही संबंध नाही, हे जनतेलाही पूर्णपणे माहिती आहे. परंतु पाटकर फाइल्सच्या माध्यमातून तुम्ही माता-भगिनींना कशा पद्धतीने त्रास दिला, महिलांचा कसा छळ केला, हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहे. जर पाटकर फाईल्स समोर आल्या तर राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही अशी टीका श्री. बन यांनी केली.
परभणीमध्ये बाण बाजूला ठेवून उबाठा गटाने खान निवडला
परभणीत निष्ठावंत शिवसैनिकाला महापौर केले असा दावा करणा-या राऊतांचा समाचार घेत श्री. बन यांनी उबाठा गटाला एकही मराठी माणूस मिळाला नाही की जाणीवपूर्वक खान निवडला ? असा खरमरीत सवाल केला. मुस्लीम महापौर करण्याबाबत भाजपाला आक्षेप नाही मात्र औरंगजेब आणि अफजलखान अजेंडा पुढे रेटण्याला विरोध आहे. ज्या परभणीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, खान निवडा किंवा बाण निवडा असे आवाहन करायचे तिथे उबाठा आणि राऊत यांनी बाण बाजूला ठेवून खान निवडला अशी बोचरी टीका श्री. बन यांनी केली.
कोणी कधी शेण खाल्ले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे असे म्हणत श्री. बन यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचा आयुष्यभर काँग्रेसला विरोध असताना सत्तेसाठी उबाठाने काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसणं म्हणजेच शेण खाणे असते असे श्री. बन म्हणाले.
चंद्रपूरवरून उबाठा गटावर आरोप झाले की राऊतांचे रडगाणे सुरू होते, पण जेव्हा एकनाथ शिंदेंवर यांच्यावर उबाठा गटाने ‘50 खोके, एकदम ओके’ म्हणत आरोप केले होते तेव्हा राऊतांकडे पुरावे होते का, असा परखड सवालही श्री. बन यांनी केला. चंद्रपुरात युती हिंदुत्व आणि विकासासाठी आहे, अधर्मासाठी नाही असेही श्री. बन यांनी स्पष्ट केले.















