सोयगाव, दि. १३ (प्रतिनिधी) : टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार सोहळा’ पुणे येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव (तिग्जी) येथील तरुण उद्योजक वसंत ईश्वर सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
दि. ७ रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केलेल्या सोनवणे यांनी वर्धा येथे ‘हेल्प ॲग्रो’ कंपनीची स्थापना केली. “विषमुक्त शेती – विषमुक्त जीवन” या संकल्पनेतून त्यांनी पर्यावरणपूरक व शेतकरीहिताचे कृषी उत्पादने विकसित केली असून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत कृषी विभागाने सन २०२३ व २०२४ मध्ये त्यांना ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच कार्याची पुढील पावती म्हणून यंदा ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार शास्त्रज्ञ डॉ. गीता जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा. संदीप सांगळे तसेच लेखिका डॉ. अर्चना देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना वसंत सोनवणे यांनी मार्गदर्शक जयदीप व्यास, अनंत प्रधान, शिवाजी नारकर तसेच वडील ईश्वर सोनवणे, आई शोभाबाई सोनवणे, भाऊ अमोल सोनवणे, पत्नी प्रिती सोनवणे व कु. पायल पवार यांचे आभार मानले.
या यशाबद्दल अंजनाई गोशाळा आमखेडाचे अध्यक्ष संदीप इंगळे, नितीन सोमवंशी, जितेंद्र पवार, नितेश सोमवंशी, मच्छिंद्र सोनवणे तसेच वर्धा येथील पांडुरंग बडगर, निलेश नेहारे, संदीप रघापहे, सागर दिघोडे आदींसह छत्रपती संभाजीनगर व वर्धा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
















