भारतातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात ज्या व्यक्तींनी परंपरांना हादरा दिला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि उपेक्षित समाजाला अभिव्यक्ती दिली, त्यामध्ये कवी नामदेव ढसाळ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते केवळ कवी नव्हते, तर ते एका जिवंत सामाजिक आंदोलनाचे प्रतीक होते. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्याच्या चौकटी मोडून काढल्या आणि दलित साहित्याला जागतिक व्यासपीठावर नेऊन पोहोचवले.
नामदेव ढसाळ यांनी आपल्या लेखनातून समाजातील भीषण वास्तव, जातीय शोषण, लैंगिक अन्याय, गरिबी, हिंसा आणि मानवी वेदना निर्भीडपणे मांडल्या. त्यांच्या कवितांमध्ये सौंदर्य नव्हते, तर सत्य होते; अलंकार नव्हते, तर आक्रोश होता; कल्पनाविलास नव्हता, तर जगण्याचा कठोर अनुभव होता.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी इ.स. १९४९ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसरजवळील पूर या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण ढसाळ तर आईचे नाव साळुबाई ढसाळ होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले.
मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. कुटुंब सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल होते. उपजीविकेच्या शोधात कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि कामाठीपुरासारख्या परिसरात वास्तव्यास लागले. या परिसरात त्यांनी आयुष्याच्या अत्यंत विदारक अनुभवांना तोंड दिले.
नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. कामाठीपुरा हा परिसर वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी, दारिद्र्य, व्यसनाधीनता आणि मानवी शोषण यासाठी ओळखला जात होता आणि सामाजिक उपेक्षेचे जिवंत रूप होता. या वातावरणात वाढताना ढसाळ यांनी समाजाच्या विदारक वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
याच वास्तवाने त्यांच्या संवेदनशील मनावर खोल ठसा उमटवला. त्यांनी पाहिलेल्या आणि भोगलेल्या अनुभवांनी त्यांच्या कवितांना धार आणि प्रामाणिकता दिली. त्यामुळेच त्यांच्या कवितांमधील वास्तव हे कृत्रिम नसून अनुभूत सत्य होते. हेच अनुभव पुढे त्यांच्या कवितेचे मुख्य स्रोत ठरले.
१९७० च्या दशकात महाराष्ट्रात दलित समाजात नवचैतन्य निर्माण होत होते. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुण पिढी अन्यायाविरुद्ध उभी राहत होती. याच काळात दलित, दुर्बल, शोषित आणि पीडित घटकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना तीव्र चीड होती.
दलितांवरील वाढत्या अन्याय-अत्याचारांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी ९ जुलै १९७२ रोजी “दलित पँथर चळवळीची स्थापना” करून अनेक तरुणांना संघटित केले आणि त्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा दिला. पँथर नामदेव ढसाळ हे या चळवळीचे प्रमुख संस्थापक आणि वैचारिक आधारस्तंभ होते.
दलित पँथर चळवळ ही केवळ राजकीय नव्हती, तर सांस्कृतिक आणि साहित्यिक क्रांती होती. ढसाळ यांनी या चळवळीच्या माध्यमातून दलित समाजाला आत्मसन्मान, संघर्षाची भाषा आणि अभिव्यक्तीचे प्रभावी साधन दिले. त्यांच्या कविता या चळवळीचे घोषवाक्य बनल्या.
१९७२ मध्ये प्रकाशित झालेला ‘गोलपीठा’ हा कवितासंग्रह मराठी साहित्याच्या इतिहासातील निर्णायक वळण ठरला. या संग्रहाने प्रस्थापित साहित्यिक मूल्यांना थेट आव्हान दिले. ढसाळ यांच्या कवितांमध्ये वापरलेली भाषा ही पारंपरिक काव्यभाषेला छेद देणारी होती. अनेकांनी ती भाषा अश्लील, असभ्य असल्याची टीका केली; मात्र ढसाळ यांचे म्हणणे स्पष्ट होते “अश्लील समाज आहे, भाषा नाही.” ‘गोलपीठा’ने मराठी कवितेची दिशा बदलली. या संग्रहामुळे दलित साहित्याला मुख्य प्रवाहात स्थान मिळाले आणि नव्या पिढीतील लेखकांना निर्भीड लेखनाची प्रेरणा मिळाली.
” गोलपिठा ” (जून १९७२) – पँथर नामदेव ढसाळ यांच्या गोलपिठा या काव्यसंग्रहात मुंबईच्या गरिबी पासून ते कामगार वर्गाच्या शोषणा पर्यंतचे विविध प्रकारचे पैलू उलगडले आहेत व अत्यंत वास्तव चित्रण मांडले आहे,” गोलपिठा ” (जून १९७२) – या संग्रहाला विजय तेंडूलकरांनी जी प्रस्तावना दिली आहे. ती अतिशय अभ्यासपूर्ण अशी आहे. या प्रस्तावनेतील पुढील ओळींवरून ‘गोलपिठा’ या शब्दाचा नेमका अर्थ आणि या संग्रहातील कवितांचा आशय नेमकेपणाने स्पष्ट होतो. तेंडुलकर म्हणतात, पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’- निर्मनुष्य प्रदेश – जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणाऱ्या गटरांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाऱ्या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोपऱ्यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला ‘शरीफ’ बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणाऱ्या क्षयरोगी बापाचे, हिजड्यांचे, हातभट्ट्यांचे, आध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणाऱ्या ऊन चिकट रक्ताचे, वाफा ओकणाऱ्या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडी येणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी जे कोणी त्याच्यामागून जिवासाठी धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वांना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेस भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गिऱ्हाइकांच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जिवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया-क्षमा-शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. अशा या विश्वात राहत असतांना जे भोगले, अनुभव आले, पाहिले त्याची कविता पँथर ढसाळांनी गोलपिठातून जगापुढे मांडली. या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याची दिशाच बदलवून टाकली. या काव्यसंग्रहात मुंबईच्या विविध प्रकारच्या जगण्याची पद्धत जगासमोर आणली आहे, यामुळे पँथर नामदेव ढसाळ यांचे लेखन कार्य हे विद्रोही साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक संवादाचे प्रभावी नि उपयुक्त असे आदर्श वैचारिक लेखन निर्माण झाले आहे. हा कविता संग्रह म्हणजे प्रस्थापित समाजासाठी एक जबरदस्त चपराक आहे.
” मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले ” (१९७५) या संग्रहातील पँथर नामदेव ढसाळांची भूमिका केवळ साहित्यिक नसून ती ठळकपणे राजकीय व विद्रोही आहे. ढसाळांनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तवाचे निर्भीड चित्रण करताना विषमता, शोषण, भ्रष्टाचार आणि जातीय व्यवस्थेच्या अमानवी स्वरूपावर तीव्र प्रहार केला आहे. त्यांच्या लेखनात दलित जीवनातील वेदना, अन्यायाविरुद्धचा संताप आणि परिवर्तनाची आंतरिक आकांक्षा प्रकर्षाने दिसून येते. परंपरागत नैतिकता, धर्म आणि सत्ताकेंद्रांवर प्रश्न उपस्थित करत ढसाळांची भूमिका ही शोषितांचे प्रतिनिधित्व करणारी आणि व्यवस्थेला आव्हान देणारी ठरते. त्यामुळे हा संग्रह केवळ काव्यात्मक अभिव्यक्ती न राहता तो सामाजिक-राजकीय जाहीरनामा बनतो. त्यांनी स्पष्ट केलेली विषमता, शोषण, भ्रष्टाचार आणि जाती व्यवस्थे बद्दलची भूमिका लक्षणीय म्हणावी लागेल.
” आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र – प्रियदर्शिनी ” (२५ ऑगस्ट १९७६) – या दीर्घ कवितेत पँथर नामदेव ढसाळांनी इंदिरा गांधींच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी काव्यात्मक आलेख मांडला आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे सामान्यीकरण अशा एका मागोमाग एक घेतलेल्या निर्णयाने समाजवादाकडे वाटचाल करणाऱ्या, पुर्व पाकिस्तानातल्या अन्यायाला विश्वभर वाचा फोडत लीलया युद्धं जिंकणार्या व्यक्तीमत्वाशी झालेली एकात्मता या दीर्घ काव्यात प्रकट झाली आहे.
” तुही यत्ता कंची? तुही यत्ता ” (१९८१) – हा पँथर नामदेव ढसाळ यांचा चौथा काव्यसंग्रह असून, ५१ कवितांतून त्यांच्या काव्यप्रवासाचे सर्वगामी व परिपक्व रूप प्रत्ययास येते. या संग्रहात विद्रोह, करुणा, आत्मपरीक्षण आणि सामाजिक भान यांचे अनेक समृद्ध रंग एकत्र विणलेले दिसतात. स्वतःच्या अनोख्या भाषाशैलीतून आणि निर्भीड अभिव्यक्तीतून ढसाळांनी या संग्रहाला केवळ वेगळेपण दिले नाही, तर मराठी कवितेला नवी दिशा देणारे विद्रोही साहित्य निर्माण केले आहे. त्यामुळे हा संग्रह त्यांच्या काव्यकारकीर्दीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरतो. या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने एप्रिल १९९९ मध्ये केशव मेश्राम यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत असे नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा नामदेव ढसाळ यांचा मूळ शक्तिस्रोत आहे. ह्या केंद्रमाध्यमातूनच त्यांच्या लढ्यासाठी त्यांनी स्फूर्ती, हुरूप आणि हिंमत घेतली आहे. व्यवहारात आणि जीवनकलहात माणूस म्हणून काही स्वाभाविक तडजोडी त्यांनी केल्या असतील; पण राजकीय जीवनाचे तेही एक महत्त्वाचे अविभाज्य अंग असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कविता होणे, हा त्या त्या वर्षाचा एक संकेत त्यांनी मानला आहे. ‘आंबेडकर १९७८’, ‘आंबेडकर १९७९’, ‘आंबेडकर १९८०’ आणि ‘आंबेडकर १९८१’ या कविता व ‘रमाबाई आंबेडकर’ ही कविता या दृष्टिकोनातून वाचली तर ढसाळांच्या वैचारिक बांधिलकीचे स्वरूप खूप स्पष्टपणे ध्यानात येते. यावरून असे लक्षात येते की, ढसाळ यांच्या काव्य आणि जीवनप्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रस्थानी असून, ते त्यांच्या वैचारिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग होते. त्यामुळे आंबेडकरविचार ढसाळांसाठी केवळ प्रेरणा नसून जीवनशक्तीचे स्रोत ठरले.
” खेळ ” (१९८३) – यामध्ये हा सर्वात ‘हटके’ काव्यसंग्रह आहे आणि हा पँथर ढसाळांने ‘समस्त स्त्रीपुरुषांच्या कामविलासां’ ना अर्पण केला आहे. हेच त्याचे वैशिष्ट्य ठरते. कवितेला पँथर ढसाळांना कुठला विषय वर्ज्य नव्हताच ! हे या संग्रहातून प्रकर्षाने दिसून येते. यातील प्रतिमाशैली वेगळी दिसते व अत्यंत तरल आणि कल्पनेहून भिन्न अशा प्रतिमा आणि त्यासाठी कवितेमध्ये एक कुसुमाग्रज वगळता अत्यंत वाईट रोमँटिसिझमचा भ्रष्ट अवतार होता त्यालाही प्रथमच पँथर ढसाळांनी उडवून लावला ही या कविता संग्रहातील वेगळी बाब कुणाही समीक्षकानं लक्षात घेतली नाही हे खेदजनकच, रोमँटिसिझम मॅच्युअर्ड आणि एक मुग्ध बाजातली कविता या कवितासंग्रहात प्रथम दिसून आली.
” गांडू बगीचा ” (१९८७) या काव्यसंग्रहातील प्रतिमा आणि शैली कमालीची वेगळी असून त्या प्रभावीपणे सिद्ध करतात. पँथर नामदेव ढसाळ यांची ही तडफड त्यांच्या कवितेत शोषित समाजाची ज्वलंत गर्जना आणि तीव्र आक्रोश आहे; परंतु हा आक्रोश असह्यतेकडे न जाता निश्चित पर्यायाकडे, उत्तराकडे जाणारा दिसतो.
” या सत्तेत जीव रमत नाही ” (६ डिसेंबर १९९५) – हा अगदी वेगळ्या धाटणीचा संग्रह आहे. मानवाच्या एकूण अस्तित्वाचा विचार या कवितांत अभिव्यक्त झाला आहे. मानवी जीवनातील अटळ वेदनाभोगाचा ते तळस्पर्शी विचार करीत असल्याचे जाणवते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरा बद्दल असलेले निस्सिम प्रेम या शब्दातून प्रकट करतात.
” डॉ. आंबेडकरांना
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दु:ख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
सर्व पुण्याई तुझीच आहे ”
अशा शब्दांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरावरील अपार श्रद्धा आणि निष्ठा स्पष्ट दिसून येते.
” मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे ” (१५ फेब्रुवारी २००५) – हा काव्यसंग्रह पँथर नामदेव ढसाळांनी सत्य परिस्थितीवर आपल्या धारदार, प्रखर आणि ज्वलंत विद्रोही लेखणीतून आसूड ओढून रचला गेला आहे. त्यांच्या शब्दांमध्ये हृदयाला थेट भिडणारी तीव्रता आहे; ती अंतर्मनाला हलवते आणि जीवनाचा अर्थ अधिक गंभीरतेने पाहण्यास प्रवृत्त करते.
” हाडकी हाडवळा ” (कादंबरी १९८१) – ‘हाडकी हाडवळा’ म्हणजे महारांनी मिळालेली सामुहिक इनामी जमीन. या इनामांची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोहोचतात. हाडकी हाडवळा या शिर्षकाखाली हे जे लेखन आता ग्रथंरुपाने प्रसिद्ध आहे. त्याची जात ‘ऑटो नॉव्हेल’ या नव्याने रुढ होत चाललेल्या लेखनप्रकाराशी मिळती जुळती आहे. या लेखनातील कालखंड ढसाळांच्या लहानपणाशी निगडीत आहे. पद्मश्री ढसाळांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या कालखंडात त्यांच्याभोवती वावरणाऱ्या महार कुटुंबातील आणि महारांशी संबंधीत अशा अन्य जातींमधील स्त्री-पुरूषांचे, त्यांच्या रागा-लोभाचे, विकार-विकासाचे, द्वेष-जिव्हाळ्याचे, त्यांच्यातील मनमेळाचे आणि प्रसंगी अंतर्विरोधाचेही प्रत्यक्ष चित्रण म्हणजे हे लेखन.
” निगेटिव्ह स्पेस ” (कादंबरी १९८७) – यामध्ये पँथर नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या शहराचे मांडलेले प्रत्यक्ष चित्रण म्हणजे हे लेखन होय.
” माझं शापित बालपण ” – आत्मकथनामध्ये दारिद्र व दैन्यवस्था मांडली आहे.
” तुझे बोट धरुन चाललो आहे ” – या संग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचा श्रद्धाभाव, आदर व आदर्श वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त झालेला आहे. विभिन्न काळात लिहिलेल्या कवितांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणा त्यामुळे संघर्षशील झालेल्या मनाला, कवीचे त्यांच्याशी असणारे आंतरिक नाते, त्यांच्याविषयी वाटणारी अपार कृतज्ञता ह्यांचे या तून दर्शन घडते.
” आंधळे शतक ” (१९९५) – ही दोन्ही पुस्तके (आंधळे शतक व सर्व काही समष्टीसाठी) वर्तमानपत्रातील सदर लेखनाचा भाग आहे. ही ललित लेखा बरोबरच वैचारिक लेखांचा हा संग्रह आहे. आपल्या चिंतनशील ललित गद्याद्वारे ढसाळांनी मराठी ललित गद्यामध्ये वस्तूत: स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे; पण त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. या दोन्ही पुस्तकातील काही वैचारिक लेखन विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक वाङ्मयीन विषयांना आपल्या स्वतंत्र दृष्टीतून भिडणारे आहेत. परंतू त्यामध्ये विषयनिष्ठा याबरोबरच आत्मनिष्ठही डोकावते. मग विषय वास्तवाची वस्तूनिष्ठ तर्कनिष्ठ मांडणी जी वैचारिक लेखनात अभिप्रेत असते. त्या अपेक्षांना ते लेख छेद देताना दिसतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वच लेख स्फुट लेखांच्या स्वरुपातील आहेत. त्यामुळे संगतवार सुसूत्र एखाद्या विषयाची मांडणी त्यांनी अपवादानेच केली आहे. म्हणून या सर्व विस्कळीत पसाऱ्यातून हे सर्व चिंतन निवडून त्यांची मांडणी करावी लागते. या मध्ये ” पँथर ढसाळांनी शिवसेना आणि त्यांचे हिन्दुत्व शिवशाही आणि शिवाजीचे केलेले उपयोजन यावर टिका केली. शिवसेनेची धोरणे ही जमातवाद, मुस्लिमद्वेष, प्रांतवाद, भाषावादावर अधिष्ठित असल्याने ते एक प्रकारे शिवशाहीचे विडंबन आहे असे म्हणतात. पण पुढे ‘सर्व काही समष्टीसाठी’ या लेखन संग्रहात ही भूमिका बदलली असून तिथे मात्र शिवसेनेचे समर्थन केलेले आढळते. (नामदेव ढसाळ यांचे चिंतन पान-क्र.१८, लेखक- डॉ.निळकंठ शेरे “) (सर्व काही समष्टीसाठी-भाग १ व भाग २)
” आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट , कम्युनिस्ट ” (१९९४) – या पुस्तकापासून पँथर ढसाळांची, डाव्या तथा कम्युनिस्टांच्या व्यवहारावरील टिका तीव्र झालेली आहे. ही मार्क्सवादी विचारांपेक्षा कम्युनिस्ट नेतृत्व, कार्यकर्ते आणि कार्यक्रमावरील टीका आहे. कम्युनिस्टांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील टीकेचा प्रतिवाद करणारी आहे. या पुस्तकेमधून वैचारिक, तात्विक चर्चा करणारे, भूमिका मांडणारे पद्मश्री ढसाळ दिसतात. ( नामदेव ढसाळ यांचे चिंतन पान क्र.१४, लेखक – डॉ. निळकंठ शेरे)
” सर्व काही समष्टीसाठी ” भाग १ (२००१ पासून सामना दैनिकात स्तंभलेखन सलग दहा वर्ष केले, नंतर पुढे पुस्तक रुपान परममित्र प्रकाशन २००५ मध्ये प्रकाशित केले.)
” सर्व काही समष्टीसाठी ” भाग २
” निवडक लेख जानेवारी ते नोव्हेंबर ” – २०१२
” चिंध्यांची देवी आणि इतर कविता ” – मार्च २०१२
” मुक्त संवाद ” (मुलाखत अनुष्टुभ दिवाळी)
” माझी सिमाँ द बूव्हॉ!- प्रहार दै.२०११ जानेवारी
” बुद्धधर्म : काही शेष प्रश्न ”
” दलित पँथर एक संघर्ष ” ( १ मे २०१४) – मृत्यूशय्येवर लिहिलेला अखेरचा दस्तऐवज.
ही त्यांची मोलाची साहित्यसंपदा होय व त्यांच्या साहित्य संपदेसाठी खालील प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले.
– महाराष्ट्र राज्य पुरस्कार गोलपिठा – १९७२, सोव्हिएत लँड नेहरु पुरस्कार १९७५-७६, महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार – १९८३, पद्मश्री पुरस्कार – १९९९, बहिणाबाई चौधरी पुरस्कार, पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी सुवर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार – २००५, गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार – २००६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव इ.स.२००९, मारवाडी फाउंडेशन डॉ.आंबेडकर पुरस्कार – २०१०, पुणे विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार – २०१०, भारतीय विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार – २०११ ने पद्मश्री नामदेव ढसाळांना सन्मानित करण्यात आले होते.
जागतिक वाङ्मयात सन्माननीय स्थान मिळवणाऱ्या ग्रंथांपैकी “दि अॅटलस ऑफ लिटरेचर” मध्ये मराठी साहित्यातील बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ (ज्यांचे २०१४ मध्ये निधन झाले) आणि विलास सारंग या नावांचा उल्लेख आहे. बागुल आणि ढसाळ यांनी जे जीवनदृष्टी आणि जगदृष्टी वाङ्मयात आणली, ती केवळ मराठी वाचकांनाच नव्हे, तर परदेशी वाचकांनाही लक्षणीय व नोंद घेण्यासारखी वाटली. (अनुष्टुभ मे / जून ९९, पृ. ३९)
प्रख्यात नोबेल विजेते लेखक व्ही. एन. नॉयपॉल यांनी आपल्या पुस्तकात घेतलेली नामदेव ढसाळांची मुलाखत, ढसाळांच्या कवितांचे परदेशी भाषांमध्ये झालेले भाषांतर, २००१ मधील इंटरनॅशनल बर्लिन फेस्टिव्हलमधील त्यांचा सहभाग तसेच २००७ मध्ये मुंबईत आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव वरून हे स्पष्ट होते की, पँथर नामदेव ढसाळ हे जागतिक वाङ्मयात मराठीचे सक्षम प्रतिनिधीत्व करणारे होते.
खरेतर, पँथर ढसाळांच्या कवितेत व्यक्त होणाऱ्या जाणीवा देश, भाषा आणि काळाच्या सीमांना ओलांडून जातात आणि त्या मानवतेच्या सर्वश्रेष्ठ मूल्याशी संबंधित आहेत. त्यामुळे, त्यांच्या कवितेला जागतिक दर्जाची कविता मानली जाते. त्यांनी आपले लेखन संपूर्णपणे मराठी भाषेतून केले असून, स्वभाषेतून मानवतेच्या जाणीवा व्यक्त करणारे पँथर नामदेव ढसाळ आजही त्यांच्या कवितांमधून जागतिक वाङ्मयात मराठीचे गौरवशाली प्रतिनिधित्व करतात.
त्यांच्या शब्दांमध्ये उमटलेली मानवी संवेदना आणि जीवनदृष्टीची उत्कटता आढळते, देश, भाषा आणि काळाच्या सीमांपलीकडे जाणारी आहे. म्हणूनच, पँथर नामदेव ढसाळ हे फक्त मराठी साहित्याचेच नव्हे, तर जागतिक साहित्याचेही स्मरणीय आणि आदरयुक्त नाव ठरतात.
अशा प्रकारे त्यांचे साहित्यवृत्तीत वेदना, विद्रोह आणि अन्यायकारी व्यवस्थेविरुद्धचा ठाम नकार प्रकर्षाने जाणवतो. भारतातील प्रस्थापित पांढरपेशे लेखक आणि रसिक यांना आपल्या अनोख्या, धारदार शैलीने हादरा देणारे ते साहित्यिक व भारतातील विद्रोही साहित्याचा प्रखर आवाज म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्य कृतीस, समतेच्या विचारास आणि त्यांच्या सत्त्याहत्तर व्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
















