मुंबई, १४ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला अधिक बळ देत टाटा मोटर्सने मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारांतर्गत २५ जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त भागांमध्ये १,५०० अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. हे विस्तारीकरण सहयोग-केंद्रित जल संवर्धन उपक्रमावर आधारित आहे. या उपक्रमाने आधीच वर्ष २०२५ मधील उन्हाळ्यापासून १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन केले आहे, ज्यामुळे ३,००० कोटी लिटरहून अधिक जल साठवण क्षमता निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमधील जवळपास ७ लाख व्यक्तींना या क्षमतेचा लाभ झाला आहे.
सार्वजनिक-खाजगी-समुदाय संचालित जल संवर्धन उपक्रमाने महाराष्ट्रातील पाणीटंचाई असलेल्या काही भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध करून दिले आहे, भूजल पातळी वाढवली आहे आणि सिंचन सुविधा सुधारली आहे. पुढील टप्प्यामध्ये हा उपक्रम नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभाग या जिल्ह्यांमध्ये विस्तार साधणार आहे.
या उपक्रमाच्या विस्तारीकरणाबाबत मत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेमधून विकेंद्रीकृत व समुदाय-केंद्रित उपाययोजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन जल सुरक्षा निर्माण करण्याप्रती महाराष्ट्राची कटिबद्धता दिसून येते. टाटा मोटर्स अनेक वर्षांपासून राज्यासाठी बहुमूल्य सहयोगी आहे, तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसह प्रामाणिक जबाबदार कंपनी म्हणून अर्थपूर्ण उपक्रम राबवत आहे. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही भूजल पातळी वाढवण्याप्रती आणि कृषी स्थिरता आणण्याप्रती आमचे प्रयत्न वाढवण्यासह दृढ केले आहेत, ज्यामुळे राज्यामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासह पाणीटंचाईचे निराकरण करण्याप्रती सरकारच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ”जल संवर्धनाप्रती आमची कटिबद्धता सरकारी योजना, दीर्घकालीन सहयोग आणि सामुदायिक मालकीहक्कामध्ये सामावलेली आहे, ज्यासह मोठ्या प्रमाणात प्रभाव घडवून आणला जात आहे. कॉर्पोरेट निधीसाह्य सीएसआर प्रयत्नामधून अनुकरणीय व शाश्वत जल संवर्धन उपक्रमापर्यंत या उपक्रमाच्या उत्क्रांतीमधून महाराष्ट्र सरकारसोबतचा आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो, तो म्हणजे शाश्वत जल उपाययोजना देणे, ज्या भूजल पातळी वाढवतात, वर्षभर पाणी उपलब्ध असण्याची खात्री देतात आणि ग्रामीण उदरनिर्वाह वाढवतात. आमची अंमलबजावणी सहयोगी म्हणून नाम फाऊंडेशनसोबत सहयोगाने आम्ही महाराष्ट्रातील ग्रामीण दुष्काळग्रस्त भागांमध्ये आम्ही अधिकाधिक पोहोचत राहू, तसेच उत्तम परिणाम साधत राहू.”
या अंमलबजावणीबाबत मत व्यक्त करत नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात म्हणाले, ”महाराष्ट्र सरकार आणि टाटा मोटर्सच्या पाठिंब्यामुळे जलसाठ्यांचे संवर्धन करण्याला गती मिळण्यासह कार्यक्षमपणे अंमलबजावणी केली जात आहे, ज्यासह ग्रामीण भागांमध्ये पाण्याची उपलब्धता, उदरनिर्वाह आणि जीवनाचा दर्जा सुधारणे असे तिहेरी लाभ मिळत आहेत. आपल्या शेतात पोषक गाळाचा वापर करण्यासह गावकरी उत्खनन केलेला गाळ आणि मुरूम यांचा वापर शेतरस्ते तयार करण्यासाठी देखील करत आहेत. समुदायाचा वाढता मालकीहक्क आणि जबाबदारीची भावना जल संवर्धन प्रयत्नांना गती देत आहे, तसेच गावाचा विकास आणि ग्राम प्रशासनामध्ये सहभाग वाढवत आहे.”
एकट्या २०२५ मध्ये आपल्या सीएसआरच्या माध्यमातून कंपनीने महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये १,००० जलसाठ्यांचे यशस्वीरित्या संवर्धन केले, ज्यासह २२५० कोटी लिटर अतिरिक्त जल साठवण क्षमता निर्माण झाली. संवर्धन करण्यात आलेल्या जलसाठ्यांमुळे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे, पिण्याचे पाणी, तसेच सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, शेतकरी एकाऐवजी दोन पिकांची लागवड करत आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत आहे आणि हंगामी स्थलांतर कमी झाले आहे. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने महिलांना दररोज पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाली आहे, ज्यामुळे त्यांना शेती, मुलांची काळजी आणि इतर उत्पादनक्षम क्रियाकलापांसाठी वेळ देता येत आहे.
















