छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे वेशभूषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा, मशाल रॅली अशा विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव गुरुवारी (१९ फेब्रुवारी) उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख, विलास खंडाळे, समितीचे सचिव संभाजी अथरगण, कोषाध्यक्ष डॉ.कृष्णा काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी देवगिरी किल्ला ते क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत मशाल यात्रा काढून वीजचोरीचे दुष्परिणाम, वीज बचत, वीजबिल भरण्याचे महत्त्व याबद्दल कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. शिवस्वरांजली शाहिरी कलापथकाचे शाहीर विलासराजे बडक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित स्फूर्तीदायी पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंतीनिमित्त यंदाही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात पाल्यांनी राजमाता जिजाऊ, शिवराय व मावळ्यांची हुबेहूब वेशभूषा साकारल्या. प्रमुख वक्ते डॉ.कोकाटे म्हणाले की, अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. जागतिक स्तरावरही अनेक योद्ध्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. आईला आदर्श मानून विज्ञानवादी जीवन जगणारा हा जगाच्या इतिहासातील सर्वगुणसंपन्न राजा होता. महाराजांचे जीवन व कार्य आजही सर्वांना प्रेरणा देते.
मुख्य अभियंता कछोट म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या कार्यापासून महावितरण कर्मचाऱ्यांनीही प्रेरणा घेत आपले काम सर्वोत्तम कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवरायांचे जीवन म्हणजे टीमवर्कचे उत्तम उदाहरण आहे. आपणही टीमवर्कद्वारे महावितरणला वीजबिल थकबाकीमुक्त करून प्रगतिपथाकडे नेले पाहिजे. उत्सव समितीने यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी. विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅप्शन : महावितरणच्या शिवजयंती सोहळ्यात बोलताना मुख्य अभियंता पवनकुमार कछोट. मंचावर व्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख, विलास खंडाळे, संभाजी अथरगण आदी.
















