ठाणे : जे अनुभवाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेली नारायण सुर्वे यांची कविता माणसातील माणूस जिवंत करणारी आहे,एवढी संवेदना यांच्या कवितेतून पाझरत असते,असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी नेरळ येथे व्यक्त केले.
कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त गिरीश कंटे यांनी संपादित केलेल्या ‘ कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव ग्रंथाचे प्रकाशन नेरळ येथील जेष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,नारायण सुर्वे यांची कविता ही वेगळ्या वाटेवरची असली तरी साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी माणसाची कविता जनमानसात पोहचवली.त्यामुळे त्यांच्या कवितेचा चेहरा हा सामान्य माणसाचा आहे.
स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान आणि पीपल्स पब्लिकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यात रानकवी तुकाराम धांडे म्हणाले की,नारायण सुर्वे यांची कविता ही डोंगराएवढी मोठी आणि झऱ्याप्रमाणे स्वच्छ आहे,म्हणूनच तिचा ओघ माणसाच्या काळजाचा ठाव घेणारा आहे.व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यासेवक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी आपल्या भाषणात नारायण सुर्वे यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे हा वेगळा इतिहास होईल.एक साध्या सोप्या विचाराचा पण तेजस्वी प्रकाश देणारा कवी ह्या मराठी भूमीत जन्मला आणि त्यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करण्याचे भाग्य आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे.कवी नारायण सुर्वे यांच्या या गौरव ग्रंथात मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य बी.डी.गायकवाड यांचा ‘मला भावलेले नारायण सुर्वे ‘ असा लेख असून अन्य जनांचेही लेख आहेत.
पीपल्स पब्लिकेशन चे प्रकाशक प्रा हरेंद्र सोस्टे यांनी ग्रंथ भाष्य करताना कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यावर आणि जीवन प्रवासावर आधारित लिहिलेल्या लेखांचे अतिशय चोखलंदपणे विवेचन केले.ह्यावेळी व्यासपीठावर कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव ग्रंथाचे संपादक गिरीश कंटे,स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान च्या संस्थापिका अनुसयाबाई जामघरे, नेरळचे माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य सावळाराम जाधव,तसेच प्रसाद बुवा पाटील,शरद भगत,कल्पेश भोईर,प्राची पाटील उपस्थित होते,ह्यावेळी ग्रंथात लेखन करणाऱ्या लेखकांचा स्मृतिचिन्ह ,ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक घिगे केले, सूत्रसंचालन वसंत घावट यांनी तर आभार प्रदर्शन संघपाल वाठोरे यांनी मानले.
















