सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.9, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह राजपूत समाजाच्या विविध मागण्या व प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी धोत्रा येथे केले. त्यासोबतच सिल्लोड येथे राष्ट्रीय महामार्गलगत लवकरच महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणार असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.
धोत्रा ता. सिल्लोड येथे गावकऱ्यांच्या वतीने महाराणा प्रताप यांची भव्य जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास ना. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात समाज बांधवांच्या वतीने समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात ना. अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
पुढे बोलत असतांना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की , धोत्रा येथे श्री सिद्धेश्वर संस्थान येथे विकास कामांसाठी 2 कोटींचा निधी देण्यात आला. मंदिर परिसरात अधिकचे विकास कामे करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून या प्रस्तावाला येत्या अधिवेशनात मंजुरी मिळावी यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. मंदिराचा जीर्णोद्धार तसेच महामार्गावर भव्य असे प्रवेशद्वार उभारण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन करीत धोत्रा येथे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देखील ना. अब्दुल सत्तार यांनी दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, संचालक श्रीरंग पा.साळवे, माजी सभापती विजय आबा दौड, राजूबाबा काळे, राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर, मानसिंग राजपूत, डॉ. विकास गोठवाल, गुलाबसिंह हजारी, आर. डी. जाधव, जीवनसिंग जाधव, ईश्वर खंडाळकर, मनोज जाधव, पंडित भुसे, राजुमिया देशमुख, पानवदोद सरपंच गजानन पन्हाळे, उपसरपंच प्रमोद दौड, पिंपळदरी सरपंच सुनील माहोर आदिंसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.