छत्रपती संभाजीनगर एन-६, संभाजी कॉलनीतील महानगरपालिकेच्या शाळेची इमारत श्री साई नॉलेज सोल्युशन संस्थेला भाड्याने दिलेली आहे. त्याठिकाणी द वर्ल्ड स्कूल या नावाने शाळा चालविली जाते. या शाळेने मनपाने घालून दिलेल्या नियमांचे व ठरावांचे वारंवार उल्लंघन केले असून त्यावर कारवाई करणे ऐवजी मालमत्ता विभाग या शाळेवर मेहरबानी करतांना दिसून येत आहे.
या शाळेने मनपाचे लाखो रुपयांचे भाडे थकवलेले आहे, तरी आतापर्यंत या श्री साई नॉलेज सोल्युशन संस्थेमार्फत द वर्ल्ड स्कुलवर कुठलीच कारवाई झालेली नाही.
४० वर्षे जुन्या व जिर्ण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर द वर्ल्ड स्कुलने लोखंडी खांब लावून त्यावर पत्रे टाकून धोकादायक बांधकाम केले आहे, त्यामुळे शाळेतील विद्यार्थी असुरक्षित आहे. सध्या पावसाळयाचे दिवस आहे. तुफानी वादळ वाऱ्यामुळे बांधकाम पडण्याची व इमारतीवरील पत्रे उडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आजुबाजूच्या परिसरातील नागरीकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना अपघात होवून जिवीतहानी होवू शकते.
काही दिवसापुर्वीच मुंबई या ठिकाणी होल्डींग कोसळून मोठी दुर्घटना झाल्याने अनेक निष्पाप लोकांना महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्राण गमवावे लागलेले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मुंबई होल्डींग सारखी दुर्घटना घडू नये, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाच्या वतीने मनपाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. वर्ल्ड स्कुल ने नगररचना व मनपाच्या परवानगीशिवाय केलेले बांधकाम विद्यार्थांच्या जीवीतास धोका निर्माण करणारे असल्याने ते तात्काळ पाडावे. तसेच द वर्ल्ड स्कुलने बांधकाम करण्यासाठी नगर रचनाची परवानगी घेतलेली नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. संस्थेकडे थकलेले लाखो रुपयांचे भाडे तात्काळ वसूल करावे व झालेला ३३ वर्षांचा करार वारंवार घालून दिलेल्या नियम, अटींचे उल्लंघन केल्याने रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने पुनश्चः एकदा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे.