कुवेतच्या मंगफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ४५ जण भारतीय असल्याचे समजते. या ४५ जणांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी कुवेतहून विमान रवाना झालं आहे. केंद्रीय मंत्री कीर्ती वधन सिंग यांनी यासंदर्भातील माहिती दिली. हे विमान केरळच्या कोची इथे उतरणार आहे.
आगीत जखमी झालेल्या भारतीयांच्या मदतीवर देखरेख करण्यासाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव लवकरात लवकर परत मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग कुवेतला पोहोचले होते. तेथे सिंग यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की अल-याह्या यांनी वैद्यकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेच्या तपासासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने समाजमाध्यमांवर म्हटले आहे की, ‘परराष्ट्र मंत्री याह्या यांनी या दु:खद घटनेबद्दल शोक व्यक्त केला. राज्यमंत्र्यांनी सर्व संबंधित कुवेती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले.’ सिंग यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली. तिथे सात जखमी भारतीयांना दाखल केले आहेत. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री एक निवेदन जारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना ‘दु:खद’ असल्याचे म्हटले.