नागपूर :- कविता म्हणजे समाजाचे आरसेपण जपणारी सर्जनशील अभिव्यक्ती. याच विचारातून कविता म्हणजे प्रबोधन, संगमनेर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महोत्सव कवितांचा’ आणि सन्मान सोहळ्यात नागपूर येथील साहित्यिक-कवी प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा साहित्यिक आणि सांस्कृतिक सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री कचेश्वर देवस्थान मंदिर, बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी संगमनेर, राहुरी, पारनेर, जुन्नर, नागपूर आणि अकोला या विविध तालुक्यांमधून निवडक साहित्यिक, कवी, विचारवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे आधुनिक गाडगेबाबा डॉ. हरिभाऊ उगले राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून कृषी उपसंचालक श्री प्रविण गवांदे यांची उपस्थिती लाभणार आहे. काव्यसंमेलनात प्रवीण बागडे हे सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयपूर्ण आणि संवेदनशील कवितांचे सादरीकरण करणार आहेत. सामाजिक प्रश्नांवरील परखड मांडणी, प्रखर शब्दशैली आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन यामुळे प्रवीण बागडे यांच्या कविता वाचक-श्रोत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या सहभागामुळे ‘महोत्सव कवितांचा’ या साहित्यिक सोहळ्याची उंची अधिक वाढली असून साहित्यप्रेमी आणि रसिकांकडून त्यांच्या निवडीचे स्वागत व कौतुक होत आहे. या महोत्सवातून कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा आणि नव्या प्रतिभांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजक गौतम वाघमारे यांनी सांगितले आहे.














