छत्रपती संभाजीनगर, दि. २५ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज आणि जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सस्टेनेबल टेक्नॉलॉजी : फंडामेंटल्स, प्रिन्सिपल्स अँड एथिक्स’ या विषयावर आयोजित पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चिंतनगाह येथे संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, भारतीय फोटोग्रामेटरी आणि रिमोट सेन्सिंग संस्थेचे प्रमुख डॉ.अनिल कुमार, श्री जमनालाल बजाज मेमोरियल लायब्ररी अँड रिसर्च सेंटर वर्धाचे संचालक डॉ.सिबी के.जोसेफ, व्हॅरॉक पॉलिमर्सचे महाव्यवस्थापक गणेश गारखेडकर, गांधी इंटरनॅशनल फ्रांस अँड असोसिएस्ट्स कम्युनिटी ऑफ आर्कचे संस्थापक, लुईस कॅम्पाना, गांधी इंटरनॅशनल फ्रांसचे ख्रिस्तोफ ग्रिग्री, कम्युनिकेशन इपिकचे संचालक अशीरबाद राहा, कम्युनिटी ऑफ आर्कच्या संचालिका मार्गारेट ब्रिजिट हिलर, युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पूनम सिंगल, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता जॉन चेल्लादुराई, प्राचार्या डॉ.विजया मुसांडे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या पोस्टर स्पर्धेत एमजीएम विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी, पीएच.डी.संशोधक, तरुण संशोधक व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी एकूण ४५ हून अधिक पोस्टर प्राप्त झाले असून त्यामध्ये हरित व स्वच्छ तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संसाधन कार्यक्षमता, शाश्वत विकास उद्दिष्टे, भारतीय ज्ञान प्रणाली तसेच तंत्रज्ञानाची सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांचा समावेश होता.
परीक्षक व मान्यवरांनी प्रत्येक पोस्टरची सखोल पाहणी करून सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विषयाची मांडणी, संकल्पनात्मक स्पष्टता व दृश्य सादरीकरण यावर विशेष भर देण्यात आला होता. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शाश्वतता, नैतिक जबाबदारी आणि आंतरशाखीय विचारसरणी रुजविण्यास उपयुक्त ठरली. तसेच तंत्रज्ञान आणि समाज यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणांसाठी प्रथम पारितोषिक सुषमा देशमुख व टीम, द्वितीय शौर्या वाकुरे व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रगती वर्मा यांनी प्राप्त केले. विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. मेधा नाईक, प्रा.शीतल बागडे आणि प्रा. रोहित राऊळ यांनी काम पाहिले.














