पिंपरी ता.१२ केंद्र सरकारने लागू केलेल्या चार नवीन श्रमसंहितांच्या विरोधात आणि जुने कामगार कायदे पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी आज,१२ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड शहर कामगार संघर्ष समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,पिंपरी चौक,पिंपरी येथे भव्य निदर्शने करण्यात आले.
राष्ट्रीयकृत कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत या आंदोलनाचे आयोजन केले होते.या आंदोलनात कामगार संघर्ष समितीने केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.कोरोना काळाचा फायदा घेत सरकारने २९ जुने कामगार कायदे रद्द करून कामगारविरोधी चार श्रमसंहिता लागू केल्याचा आरोप समितीने केला.
श्रमसंहिता रद्द करा : नवीन चार श्रमसंहिता रद्द करून जुने कामगार कायदे पुन्हा लागू करावेत.
किमान वेतन : कामगारांचे किमान वेतन ३० हजार रुपये करण्यात यावे.
पेन्शन : किमान मासिक पेन्शन १० हजार रुपये मिळावी.
गिग वर्कर्सना न्याय : गिग इकॉनॉमी’ च्या नावाखाली होणारे शोषण थांबवून गिग कामगारांना अधिकृत ‘कामगार’ दर्जा देऊन सर्व कायदेशीर अधिकार लागू करावेत.
युनियनचा अधिकार : संप करण्याचा अधिकार कायम ठेवावा आणि ट्रेड युनियन स्थापन करण्याचे कायदे सोपे करावेत.
गिग वर्करच्या शोषणावर बोट
समितीने विशेषत : ओला,उबेर, झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’च्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ‘भागीदार’ (पार्टनर) म्हणून संबोधून कंपनी कोणत्याही सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी घेत नाही,असा दावा यावेळी करण्यात आला आहे.
विविध संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनात लोक जागर,स्वराज पक्ष,जनवादी महिला संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,छावा संघटना,DYFI,RWPI,CITU आणि AITUC यांसारख्या अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत.
”लढल्याशिवाय व्यवस्था हक्क देणार नाही,” असे आवाहन करत समितीने सर्व कामगारांना या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सामजिक कार्यकर्ते मानव कांबळे,मारूती भापकर,गणेश दराडे,नरेंद्र बनसोडे,सचिन एम.आर,धनाजी येळकर,डॉ सुरेश बेरी,अपर्णा दराडे,अनिल रोहम,सतीष नायर,जयप्रकाश,अविनाश लाटकर,सुरेश बावनकर,जयश्री साळोखे,आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
















