छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव श्री.शशांक मिश्रा यांनी शुक्रवारी (14 जून) रोजी महावितरणच्या विविध विकास कामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 मध्ये जोडवाडी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे 12 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या 60 एकर शासकीय जमिनीची श्री.मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ, चित्ते पिंपळगाव व खोडेगाव 33 केव्ही उपकेंद्रांमार्फत परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे. श्री.मिश्रा यांनी खोडेगाव येथील उपकेंद्रास भेट देऊन सौर प्रकल्पाच्या अनुषंगाने उपकेंद्रात करावयाच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर चर्चा केली. सुधारित वितरण क्षेत्र योजनेत (आरडीएसएस) होणाऱ्या वाहिनी विलगीकरण, हानी कमी करणे या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. याबरोबरच विहामांडवा (ता.पैठण) येथे कुसुम –सी योजनेत उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातून कमी दरांद्वारे किती वीज निर्मिती होते आणि सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून किती वीज निर्मिती झाली, हे त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. त्यानंतर परिमंडल कार्यालयात झालेल्या बैठकीत सौर कृषी वाहिनी योजनेतील प्रकल्पांचे कार्यान्वन झाल्यावर महावितरण व महापारेषणची प्रणाली सक्षम कशी राहील याचा आढावा घेतला.
यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे उपसचिव श्री.जमिरुद्दिन अन्सारी, महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राहुल गुप्ता, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.भुजंग खंदारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री.नासेर कादरी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.प्रवीण दरोली, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री.मोहन काळोगे, अधीक्षक अभियंता (चाचणी) श्रीमती शुभांगी कटकधोंड, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) श्रीमती बीना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता (संचालन) श्री.प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता श्री.संदीप देशपांडे, श्री.दीपक सोनोने, श्री.महेश पाटील, श्री.जयंत खिरकर, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.विश्वनाथ लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.