नांदेड दि. 2 फेब्रुवारी :- राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये 51 टक्केपेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त / सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतीक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रूपये 10.00 लाखापर्यंत अनुदान योजना सन 2025-26 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्थांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी नांदेड जिल्हयातील संस्थांना शासकीय अनुदान घेण्याची इच्छा आहे अशा संस्थांकडून अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासनाने अर्ज मागविले आहेत.
पात्र संस्थांनी शासन निर्णय क्रमांक अविवि-2024/प्र.क्र.75//का-6 दि. 7 ऑक्टोबर 2024 च्या तरतूदीनुसार इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक संचिका दि.20 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा अल्पसंख्याक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
सदरहू योजना सन 2025-26 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील पात्र संस्थांना पायाभूत सुविधांसाठी रू.10.00 लक्ष इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यास मान्यता आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करतेवेळी शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2024 मधील सर्व अटींची पुर्तता करणाऱ्या संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राहय धरले जाणार नाहीत. महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय दि. 7 ऑक्टोबर 2024 मध्ये अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
















