छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (प्रतिनिधी) – जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत दरवर्षी एशियन हॉस्पिटल कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव केला जातो. कर्करोगावर उपचाराने मात करता येते, त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाता धैर्याने सामोरे जाण्याचा उद्देश असल्याचे मत एशियन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. शोएब हाश्मी यांनी व्यक्त केले.
सोमवारी हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडर येथे मराठवाड्यातील रुग्णांना सहकुटुंब आमंत्रित करुन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. नितीन ताठे यांनी उपचार केलेल्या ५० अजिंक्य योद्धांचा, ज्यांनी ५ ते १० वर्षे या आजारावर मात देऊन सामान्य आयुष्य जगत आहेत, अशांचा सत्कार केला. जागतिक कर्करोग दिनाचा (४ फेब्रुवारी) विषय युनाटेड बाय युनिक आहे. २०२६ सालचा उद्देश‘तुमची कथा इतरांचे मन बदलू शकते’ हा आहे. त्या अनुषंगाने, या कार्यक्रमात अजिंक्य योद्धांनी त्यांचे अनुभव सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपधिष्ठाता डॉ. के. डी. गर्कल, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुरेश हरबडे आदी उपस्थित होते. एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी कॅन्सर विभागातील वाढवलेल्या सुविधा सांगितल्या. नव्याने सुरू केलेला दुर्बिणीच्या शस्त्रक्रियांचा विभाग डॉ. आकाश मोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून, रेडिएशन विभाग सेवेत असल्याची माहिती दिली. डॉ. असफिया खान यांचा एशियन हॉस्पिटलच्या सिनियर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ‘डबल अजिंक्य योद्धा’ (कॅन्सरवर दोनदा मात केलेले) एकनाथ थाळक यांनी कॅन्सरच्या लवकरच्या निदानाने आणि आधुनिक उपचार पद्धतीने कॅन्सर पूर्णपणे बरा होऊन सर्वसामान्यपणे जगता येते, हा संदेश दिला. यावेळी रुग्णांसह नातेवाईकांनी केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.
















