केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देशभरात विविध ठिकाणी पार पडत आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर दिलेले असतात. त्या सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा असल्यामुळे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या सेंटरचा पत्ता गुगल मॅपवर शोधला आणि त्या ठिकाणी पोहोचले.
पण तेथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण सेंटरवर न पोहोचता दुसरीकडेच आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडली. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांना या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं
देशभरात विविध ठिकाणी यूपीएससीची परीक्षा पार पडत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्ष-वर्ष अभ्यास करत असतात. पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे परीक्षा देता आली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.