छ.संभाजीनगर –विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी,लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत(नागपूर) यांची निवड झाल्याबद्दल दि.15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता राजमाता जिजाऊ सभागृह शिवछत्रपती महाविद्यालय एन.3 सिडको छत्रपती संभाजीनगर
येथे जाहीर सत्कार आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वासुदेव मुलाटे हे आहेत.डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.प्रमुख वक्ते डॉ संजय मुन हे आहेत.या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने अँड के ई हरिदास,प्रा भारत शिरसाट ,अँड वैशाली डोळस,अनंत भवरे,अँड धनंजय बोर्डे,सतीश चकोर,राजानंद सुरडकर, सविता अभ्यंकर, डॉ समाधान इंगळे, मधुकर खिल्लारे,डॉ वैजनाथ कदम,रतनकुमार साळवे,अमरदीप वानखडे, डॉ अरुण कांबळे, सुधाकर निसर्ग यांनी केले.
२०व विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज च्या भव्य मैदानावर संपन्न होणार आहे. कवी लोकनाथ यशवंत हे १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन (छ.संभाजी नगर) अध्यक्ष डॉ.अशोक राणा (यवतमाळ) यांच्याकडून सूत्रे हाती घेतील.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतेचा पुरस्कार करते. “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही”असे म्हणत म.जोतिराव फुले यांनी उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादांच्या संमेलनास विरोध केला होता.तीच मराठी साहित्य संमेलने आता विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे मुखंड बनली आहेत. म्हणूनच विद्रोही चळवळीच्या वतीने १९९९ पासून महाराष्ट्रात मुंबई (धारावी), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार,वाशी, पुणे, मनमाड,धुळे,नाशिक,परभणी, बुलढाणा,हिंगोली, उदगीर,नाशिक, वर्धा,अमळनेर,छ. संभाजी नगर (औरंगाबाद) इ. ठिकाणी १९ साहित्य संमेलने तसेच १ आंतरराज्य (निपाणी) व १ विद्रोही स्त्री साहित्य संमेलन, पुणे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत.
कालकथित बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे,डॉ. यशवंत मनोहर,डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड,कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार,डॉ.श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ.वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा यांसारख्या सर्जनशील साहित्यिक,समीक्षक,अनुवादक, पत्रकार, इतिहासकार,नाटककार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.
*विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले कवी *लोकनाथ यशवंत*समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असून ‘आता होऊन जाऊ द्या !’, ‘आणि शेवटी काय झाले?’, ‘पुन्हा चाल करू या…’, ‘बाकी सर्व ठीक आहे…’, ‘हे तर होणार होते हे’ त्यांचे ५ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत*त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ४अनुवाद*‘ऐलान’,‘आखिर क्या हुआ’, Broken Man,The Downtrodden या नावाने प्रकाशित झाले आहेत*त्यांच्या कवितांवर ४ नाट्यरूपांतरे – एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाट्यप्रयोग झाले आहेत.त्यांच्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमी वरील “बैल” या कवितेवर ‘बाईस्कोप’ हा मराठी चित्रपट साकारण्यात आला आहे. लोकनाथ यशवंत यांनी स्वतः ४ अनुवाद मन्सूर एजाज जोश, निदा फाजली यांच्या कविता आणि सहादत हसन मंटो यांच्या लघुकथांचे हिंदीतून* मराठीत अनुवाद केले आहेत. तर बाबुराव बागुल यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद देखील त्यांनी केला आहे*
आजच्या विद्वेषी व अघोषित आणीबाणीच्या कालखंडात संविधानिक लोकशाहीवर क्रूर हल्ला होत असताना सत्य व मानवतेसाठी क्रांतीकारी कविता घेऊन मैदानात उभ्या ठाकलेल्या कवी लोकनाथ यशवंत यांच्या निवडीमुळे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित हे विसावे साहित्य संमेलन फुले शाहू आंबेडकर प्रणित समतावादी विचारांना बळ देणारे ठरेल.
















